ओमिक्रॉनच्या धास्तीने लसीकरणाचा वाढला टक्का । Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक : ओमिक्रॉनच्या धास्तीने लसीकरणाचा वाढला टक्का

नाशिक : ओमिक्रॉनच्या धास्तीने लसीकरणाचा वाढला टक्का

नाशिक : ओमिक्रॉनच्या रूपाने तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर शहरात लसीकरणाला वेगाने सुरवात झाली आहे. लसीकरण करताना नागरिकांना भीतीने ग्रासल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५७ टक्‍क्यांवर पोचली आहे. गेल्या आठ दिवसात दररोज सरासरी दहा हजार नागरिकांनी लस टोचून घेतली असून, अद्यापही एक लाख ३० हजार ४११ नागरिक असे आहेत की त्यांना पहिला डोस घेऊन ८४ दिवस उलटले तरी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतर प्रशासनाने तिसऱ्या लाटेची जोरदार तयारी सुरू केली आहे. पहिल्या लाटेमध्ये शहरात ७६ हजार नागरिक कोरोनामुळे बाधित झाले होते. एक हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत दीड लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले, तर तीन हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेला. शहरात आतापर्यंत चार हजार अकरा नागरिक बळी गेले आहेत.

हेही वाचा: जळगाव : स्वबळ गृहीत धरून तयारीला लागा

महापालिका हद्दीमध्ये २६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. प्रारंभी कोरोनायोद्धा, हेल्थ वर्कर, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर १ मेपासून अठरा वर्षाखालील सर्वांचे लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. परंतु, लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याने पुन्हा निर्णय मागे घेतला. ४५ वर्षांपुढील व्यक्तींचेच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यानंतरही नागरिक पहाटेपासून केंद्रांवर गर्दी करत होते. त्यानंतर मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होवू लागल्याने नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली. कोरोनानंतर ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाल्याने लसीकरणाचा वेग वाढला आहे. ओस पडू लागलेली लसीकरण केंद्रे आता गजबजली आहे.

दुसऱ्या डोसबाबत बेफीकीरपणा

महापालिकेने सुमारे अठरा वर्षांवरील १३ लाख ६३ हजार ७०० नागरिकांचे लक्ष लसीकरणासाठी निश्‍चित केले होते. त्यापैकी गेल्या अकरा महिन्यांच्या कालावधीत १२ लाख ४ हजार ९९३ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. शहरात एक लाख तीस हजार ४११ नागरिकांनी पहिला डोस घेऊन ८४ दिवस उलटले तरी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरविली आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ८८ टक्के आहे, तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचा टक्का ५७ वर पोचला आहे.

असे वाढले डोसचे प्रमाण

  • - १ डिसेंबर- पहिला डोस- ३,२५८, दुसरा डोस- ४,०३६

  • - २ डिसेंबर- पहिला डोस- ५,३८६, दुसरा डोस- ९,६४९

  • - ३ डिसेंबर- पहिला डोस- ५,७६१, दुसरा डोस- ९,७६१

  • - ४ डिसेंबर- पहिला डोस- ७,१२८, दुसरा डोस- १४,४८३

  • - ६ डिसेंबर- पहिला डोस- ६,५३१, दुसरा डोस- ११,४३९

  • - ७ डिसेंबर- पहिला डोस- ५,०३७, दुसरा डोस- ९,२११

  • - ८ डिसेंबर- पहिला डोस- ४.४५२, दुसरा डोस- ८,१९५

Web Title: Fear Of Omicron Increased The Percentage Of Vaccinations

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top