
Nashik Crime News : जिल्हा रुग्णालयात महिला कर्मचारी, परिचारिकेला मारहाण
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील महिला कक्षात स्वच्छता करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना कक्षाबाहेर जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने एका महिला रुग्णाने महिला स्वच्छता कर्मचारी व परिचारिकेला मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. २८) रात्री घडली.
घटनेच्या निषेधार्थ परिचारिका संघटनेकडून बुधवारी (ता. १) जिल्हा रुग्णालय प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करून सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी करीत आंदोलन करण्यात आले. (Female employee nurse assaulted in district hospital Nashik Crime News)
सरकारवाडा पोलिसात याप्रकरणी प्रिया गवई यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री जिल्हा रुग्णालयाच्या महिला रुग्ण कक्षामध्ये स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी आले असता, रुग्णांच्या नातेवाइकांना कक्षाबाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या कक्षामध्ये महिला रुग्ण प्रिया गवई हिच्यावर उपचार सुरू होते. गवईचा पती कक्षाबाहेर गेल्याने संतापलेल्या गवई हिने परिचारिका व कक्षातील मावशीस शिवीगाळ केली. रुग्णाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, तिने परिचारिका जाधव व मावशी मीना चौधरी यांना शिवीगाळ करीत मारहाण केली.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
यात दोघांनाही दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय आपत्कालीन विभागात दाखल केले. दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालयातील परिचारिका व कर्मचारी संघटनांनी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी आंदोलन केले.
रुग्णालयातील प्रत्येक मजल्यावर सुरक्षारक्षक द्यावा, पोलिस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तासभर आंदोलन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी प्रत्येक मजल्यावर एक सुरक्षारक्षक देण्याची मागणी मान्य करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.
या वेळी नर्सिंग संघटनेच्या पदाधिकारी पूजा पवार, के. डी. पवार, लता परदेशी यांच्यासह कर्मचारी संघटनेचे भगवान शिंदे, दिलीप बोडरे, चंडालिया धनवीर, अख्तर शेख, मिलिंद पवार यांच्यासह कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.