सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका
तांदूळ, डाळी आणि धान्याचे दर कडाडले; बजेट कोलमडले
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : बाजारात अन्नधान्य, डाळी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट पुरते कोलमडले आहे. दुष्काळी परिस्थिती, सणासुदीची चाहूल आणि व्यापाऱ्यांकडून होणारी संभाव्य साठेबाजी यामुळे अन्नधान्याच्या बाजारपेठेत भाववाढ पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत ही दरवाढ अशीच कायम राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
गेल्या महिन्यापर्यंत किरकोळ बाजारात ६० रुपये किलोने मिळणारा इंद्रायणी व जिरा राईस तांदूळ आता थेट ८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. येत्या २० ते २५ दिवसांत हाच दर शंभर रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. डाळींच्या दरांमध्येही वाढ नोंदविली आहे. तूरडाळीने प्रति किलो १६० ते १६५ रुपयांचा टप्पा गाठला आहे. याशिवाय मूगडाळ आणि हरभरा डाळीच्या दरातही प्रति किलो २० ते ३० रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे. डाळींप्रमाणेच गव्हाच्या दरामध्ये सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात ३५ रुपये किलोने विकला जाणारा गहू सद्यःस्थितीत ४० रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, बाजारात ज्वारीची आवक प्रचंड घटल्याने, उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. साखरेच्या दरातही पुन्हा वाढ सुरू झाली असून ४९ ते ५० रुपयांवरून साखर आता ६० रुपयांवर गेली आहे. विविध प्रकारच्या तेलांच्या दरांमध्ये पाच ते दहा टक्क्यांपर्यंत भाववाढ झालेली आहे.
नवरात्रोत्सव पाठोपाठ वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी येऊ घातली आहे. या सणानिमित्त फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी किराणा मालाला मोठी मागणी होत असते. अशा परिस्थितीत सध्याच्या महागाईमुळे सण कडवट झाल्याची अनुभूती नागरिक घेत आहेत.
----------चौकट
तांदुळाची आवक घटली
यंदा दुष्काळाच्या परिस्थितीमुळे तांदुळाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे महिन्याभरात दरांमध्ये साधारणतः २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. पुढील काही महिने तुटवडा कायम राहणार असल्याने दरवाढीची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
---