पान-३
----
OLN26A15201
मदिना चौक (जुने नाशिक) ः फटाक्यांमुळे येथील मोकळ्या जागेवरील भंगार साहित्याला रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास लागलेली आग. (छायाचित्र ः युनूस शेख)
-----
फटाक्यांमुळे चार तासात २५ ठिकाणी आग
---------
सुदैवाने जीवितहानी नाही ः एकाचवेळी घटनांनी अग्निशमनची मात्र धावपळ
-----------
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. ८ : फटाक्याच्या आतषबाजीने अवघ्या चार तासात आगीच्या २५ घटना घडल्या. सुदैवाने कुठल्याही घटनेत जीवितहानी झाली नाही. असे असले तरी एकाच वेळी शहराच्या विविध भागात घटना घडल्याने अग्निशमन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडालेली दिसून आली.
-----------
दरवर्षी फटाक्याच्या आतषबाजीमुळे आग लागण्याच्या घटना घडत असतात. याची दक्षता घेत अग्निशामक विभाग सज्ज होते. रविवारी (ता. ८) रात्री लक्ष्मीपूजन संपन्न होताच सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. यामुळे शहराच्या विविध भागात मोकळे मैदान, पडके वाडे, कचराकुंडी अशा विविध भागात आग लागण्याच्या घटना घडल्या. रात्री सात ते दहाच्या दरम्यान चार तासात तब्बल २५ ठिकाणी लहान मोठ्या स्वरूपात आग लागल्याने अग्निशमन विभागाचा भ्रमणध्वनी सतत खणखणत होता.
सारडा सर्कल येथील मदिना चौक परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर पडीक अर्थात वाहनांचे सीट कव्हर, कुशन, इतर स्क्रॅप साहित्य आणि मैदानावरील कचरा झाडेझुडपे यांना रात्री पावणेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे उंचउंच लोट आणि धुराने संपूर्ण परिसर जणू अंधारला होता. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन मुख्यालयाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत आगीवर पाण्याचा मारा करून नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. आगीची तीव्रता अधिक असल्याने सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले. असे असले तरी भंगार साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याखाली आगीचा विस्तव असल्याने पुन्हा आग भडकण्याची शक्यता लक्षात घेता अग्निशमन विभाग घटनास्थळी तळ ठोकून होते. राजीवनगर येथील मोकळ्या मैदानावरही मोठी आग लागली होती. स्थानिक नागरिक आणि सिडको अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मेन रोड मुख्य बाजारपेठेतील एका दुकानाच्या वरील बाजूस वाढलेल्या झाडाझुडूपांमध्ये आग लागल्याची घटना घडली. शहराच्या सर्वच भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात आगीच्या घटना घडल्या. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही.
-----------------