फटाके फोडण्यास विरोध;
चौघांकडून प्राणघातक हल्ला
खडके चाळ परिसरातील घटना; मुलगा गंभीर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : शहरातील खडके चाळ परिसरात फटाके फोडण्यास विरोध केल्याचा राग आल्यावरून चौघा जणांनी घरात घुसून एका कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत अल्पवयीन मुलाच्या डोक्यात लाकडी दांडा लागून तो गंभीर जखमी झाला आहे. शहर पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नलिनी रमेश बाविस्कर (वय ७०) या सोमवारी (ता. ९) रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या घराच्या हॉलमध्ये टीव्ही बघत असताना संशयित दीपक किशन सोनवणे व सीमा दीपक सोनवणे (दोन्ही रा. खडके चाळ, जळगाव) यांनी त्यांच्या घरात घुसून वृद्धेस चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. यानंतर नलिनी यांचा मुलगा हर्षल हा बाहेर निघाला असता, त्याच्या दुचाकीची नासधूस केल्याचे दिसून आले. त्यावरून जाब विचारल्यावरुन पुन्हा वाद वाढून संशयित अक्षय सोनवणे याने लाकडी दांड्याने अल्पवयीन मुलगा हर्षल याच्या डोक्यात मारले. तसेच विशाल सोनवणे यानेही फिर्यादीच्या मुलाला चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस नाईक प्रदीप पाटील तपास करीत आहेत.