महागाईमुळे फटाक्यांच्या दरांत २० टक्के वाढ
आकाश उजळवणाऱ्या फॅन्सी फटाक्यांना पसंती;खरेदीचा उत्साह कायम
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. ६ : दिवाळी म्हटली की फटाक्यांची आतषबाजी आलीच. मात्र, वाढते प्रदूषण आणि ध्वनी मर्यादेचे निर्बंध लक्षात घेता, यंदा न्यायालय व सरकारच्या सूचनेनुसार बाजारात कमी प्रदूषण करणारे आणि कमी आवाजाचे ‘ग्रीन’ व फॅन्सी फटाके विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे जमिनीवर वाजणाऱ्या फटाक्यांपेक्षा संपूर्ण आकाश उजळून टाकणाऱ्या विविध प्रकारच्या फटाक्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
पूर्वी सुतळी बॉम्ब, लवंगी, डबल बार, भुईचक्र, सुरसुरी, रॉकेट आणि टिकल्या अशा पारंपरिक फटाक्यांना मोठी मागणी असत; परंतु या फटाक्यांमुळे हवेचे व ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर, प्रशासन व न्यायालयाने फटाके उडविण्यावर काही निर्बंध लादले आहेत. या नियमांचे पालन करत उत्पादक व विक्रेत्यांनी कमी आवाजाचे व प्रदूषण घटवणारे फटाके बाजारात आणले आहेत. जमिनीऐवजी आकाशात फुटणाऱ्या फॅन्सी फटाक्यांमुळे ध्वनी व हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अशा फॅन्सी फटाक्यांना यंदा सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, वाढत्या महागाईमुळे यंदा फटाक्यांच्या दरांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
---चौकट
लेझर फटाक्यांचे विशेष आकर्षण
आकाशात विविध रंगांची उधळण करणाऱ्या फॅन्सी फटाक्यांमध्ये फुलपाखरू, शिटी वाजवणारे चक्र, आकाशात उडून फुटणारे शॉट्स, तसेच ३०, ६०, १२०, २५० आणि तब्बल १ हजार शॉट्स एकाच वेळी उडण्याची क्षमता असलेल्या फटाक्यांचा समावेश आहे. याशिवाय, पूर्वी केवळ दोन रंगांत मिळणारी सुरसुरी यंदा सहा रंगांत उपलब्ध झाली आहे. यंदा प्रथमच बाजारात आलेल्या ‘लेझर फटाक्यांचे विशेष आकर्षण असून, ५ टप्प्यांत १०० ब्लास्ट करण्याची क्षमता असलेल्या या फटाक्यांची किंमत सुमारे साडेचार हजार रुपये आहे.
--
स्वदेशीची चलती
नाशिक फटाका असोसिएशनच्या सदस्यांनी केवळ स्वदेशी फटाक्यांच्या विक्रीवर भर दिला आहे. चायना फटाक्यांमुळे प्रदूषण वाढ होत असल्याने त्यांच्यावर बंदी आहे. असोसिएशनचे अधिकृत विक्रेते केवळ नियमांचे पालन करणारे स्वदेशी फटाकेच विकत आहेत.
सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यावर बंदी आणि प्रदूषणमुक्त फटाके वापरण्याच्या आवाहनामुळे खरेदी-विक्रीवर परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रत्यक्ष बाजारात फटाके खरेदीसाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसत असून विक्रीवर कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही फटाक्यांना मोठी मागणी आहे.
---कोट
न्यायालय आणि सरकारच्या नियमानुसार फटाके विक्री केली जात आहे. दरांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. फॅन्सी फटाक्यांना सर्वाधिक मागणी आहे.
- अमोल बर्वे, फटाके विक्रेता
................
असे आहेत दर
फटाके....................१० ते १० हजारापर्यंत
सुरसुरी पॅकेट.................१०० ते ५००
झाड.....................२०० ते १ हजार बॉक्स
भुईचक्र....................१५० ते ४५० बॉक्स
लवंगी फटाके................२०० (१० लड)
सुतळी बॉम्ब.................६० ते २०० बॉक्स
रॉकेट......................१५० ते ६०० बॉक्स
शॉर्ट फटाके..................५०० ते १० हजार
लेझर फटाके..................४ हजार ५००