जळगावातून पाच संशयितांना अटक
-----
भुसावळात गुन्हा घडविण्याच्या तयारीत असल्याचे तपासात निष्पन्न
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.११ : भुसावळ येथे गुन्हे शाखेने पाच संशयितांना ताब्यात घेतले. भुसावळमधील गुन्हेगारी कारवायांना सध्या तरी आळा बसला आहे. नवरात्रोत्सवात गुन्हेगारी नियंत्रणात राहावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहिमेत ही कारवाई केली.
या मोहिमेत गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या अट्टल गुन्हेगाराने भुसावळच्या काही सराईत गुन्हेगारांनी जळगावात आश्रय घेतल्याची माहिती दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने या संशयितांचा शोध सुरू केल्यावर जळगावच्या पिंप्राळा शिवारातील सिल्क मिल परिसरात कार (एमएच १९, एई १३५५) घेऊन मोठ्या गुन्ह्याच्या प्रयत्नातील पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल नऊ लाख ७२ हजार ६०० रुपयांची घातक शस्त्रे, मोबाईल व वाहनासह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
धडक कारवाई
पोलिस अधीक्षक व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक संदीप गावित, उपअधीक्षक नितीन गणापुरे, वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पथकाने रविवारी (ता. ११) पहाटे अडीचच्या सुमारास पाठलाग करून संशयितांना सिल्क मिल परिसरात घेराव घालून ताब्यात घेतले.
शस्त्रसाठा, मुद्देमाल जप्त
दोन गावठी पिस्तुलांसह ७ जिवंत राऊंड, धारदार सुरा, कोयता, सहा तोंड झाकण्याचे मास्क, मिरची पुड, चार मोबाईल, कार असा जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत
संशयित अरविंद विजय कांबळे (वय २६, रा. कासोळा, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम), खुशाल गजानन बोरसे (३०, रामदास वाडी, खडका रोड, भुसावळ), सोनू महेंद्र जयस्वाल (२७, सातेवाडी नाका, वसई ईस्ट, पालघर), रानू ऊर्फ ओमकार अंकुश भदरगे (२९, शास्त्रीनगर, ठाणे वेस्ट, मुंबई), संदीप बबन लोंढे (३५, १०० फुटी रोड, जळगाव) प्राणघातक शस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिस नाईक मुकुंद गवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाचही संशयितांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस संशयितांची कसून चौकशी करीत आहेत.
(बोल्ड चौकट)
नवरात्रोत्सवातच होता मोठा गेम
आगामी नवरात्रोत्सवातील गाफील प्रतिस्पर्धी टोळीचा गेम करण्याचा प्लॅन अटकेतील संशयितांनी आखला होता. भुसावळच्या गुन्हेगारीत प्रस्थापीत एका टोळीतील तिघांचा व त्यावेळेस जो समोर असेल, त्याचा खात्मा करण्याची सुपारी या पाचही संशयितांनी घेतली होती. अटकेतील पाचही संशयितांना तब्बल ३५ लाखांची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्या दिशेने गुन्हे शाखा व दस्तुरखुद्द पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक, उपअधीक्षक संशयितांची गेल्या दोन रात्रींपासून कसून चौकशी करीत आहेत.