इगतपुरी, नाशिक- इगतपुरीत सलग दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावत तीन अधिकाऱ्यांसह पाच लाचखोरांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. यात पालिकेचा लेखापाल, संगणक अभियंता आणि सफाई कामगाराचा, तर पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीचा समावेश आहे. मंगळवारी (ता. १३) सायंकाळी आणि बुधवारी (ता. १४) सकाळी ही कारवाई करण्यात आली. रेशनकार्ड काढणे आणि पालिका कामांची बिले मंजूर करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.पालिका हद्दीत सीसीटीव्ही बसविणे, संगणक प्रिंटर पुरविणे व त्याची देखभाल दुरुस्तीच्या कामांच्या बिलांपोटी एक लाख ७० हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. पालिकेचा लेखापाल सोमनाथ बोराडे, संगणक अभियंता सूरज पाटील (३२), सफाई कामगार नितीन लोखंडे (४४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.