ध्वजारोहण सोहळा पुरवणी : कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह लेख

ध्वजारोहण सोहळा पुरवणी : कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह लेख
Published on: 
ध्वजारोहण सोहळा पुरवणी -------------------------------------------- ध्वजारोहणाने महाकुंभाची पहिली कसोटी; सर्व यंत्रणा सज्ज नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संवाद लीड सिंहस्थाशी संबंधित ८५ टक्के कामे ही दीर्घकालीन विचार करून आखली असून, त्याअनुषंगाने विकासकामांना गती देण्यात येत आहे. या नियोजनात ध्वजारोहण सोहळा हा प्रमुख टप्पा आहे. नाशिक-त्र्यंबकेश्‍वर येथे शनिवारी (ता. ३१) होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे हा सोहळा म्हणजे सिंहस्थाची पहिली कसोटी असून, हा सोहळा भव्यदिव्य पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा एकत्र समन्वयातून कार्य करत आहेत, अशी माहिती सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना दिली. -- प्रश्न : ध्वजारोहण सोहळ्याची तयारी सध्या कोणत्या टप्प्यावर आहे? शेखर सिंह : ध्वजारोहण सोहळ्यामुळे कुंभपर्वाच्या तयारीला एक औपचारिक आणि व्यापक स्वरूप प्राप्त होणार आहे. रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ या दोन्ही ठिकाणी कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. राज्य शासन, नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, पुरोहित संघ आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यात येत आहे. राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याने सुरक्षा, वाहतूक, गर्दीचे व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि कार्यक्रम स्थळावरील व्यवस्था या प्रत्येक बाबीला विशेष महत्त्व आहे. हा केवळ एक दिवसाचा सोहळा नसून, सिंहस्थासाठी विविध यंत्रणा एकत्रितपणे कशा काम करतात, याचीही ती महत्त्वाची चाचणी असेल. --- ध्वजारोहण सोहळ्याच्या नियोजनातील सर्वाधिक आव्हान कोणते? : ध्वजारोहणासारख्या भव्यदिव्य कार्यक्रमात अनेक घटक एकाच वेळी कार्यरत असतात. भाविकांची श्रद्धा आणि सोहळ्याचे धार्मिक महत्त्व जपत सुरक्षा, वाहतूक, वेळेचे नियोजन आणि नागरिकांची गैरसोय कमीत कमी ठेवणे आवश्यक असते. रामतीर्थ आणि कुशावर्त तीर्थ येथे स्वतंत्र व्यवस्था उभारतानाच दोन्ही ठिकाणांतील समन्वयही महत्त्वाचा आहे. कार्यक्रमस्थळांवरील प्रवेश आणि निर्गमन, गर्दीचा प्रवाह, आपत्कालीन प्रतिसाद, वैद्यकीय मदत, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि दिशादर्शक फलक या सर्व बाबींचे नियोजन केले जात आहे. संबंधित विभागांशी नियमित चर्चा करून जबाबदाऱ्या निश्चित केल्या जात आहेत. अशा सोहळ्यात यश हे केवळ कार्यक्रम सुरळीत पार पडण्यात नसते; तर नागरिक आणि भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि समाधानकारक अनुभव मिळण्यात असते. -- ध्वजारोहण सोहळ्यानंतर सिंहस्थाची तयारी कोणत्या दिशेने पुढे जाईल? : ३१ ऑक्टोबरच्या सोहळ्याने सिंहस्थाचा शंखनाद होत असून, पुढील तयारीसाठी तो महत्त्वाचा टप्पा आहे. रस्ते, घाट, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वीज, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापन अशा अनेक आघाड्यांवर काम सुरू आहे. या कामांचा आढावा घेताना केवळ बांधकाम पूर्ण झाले का, एवढाच विचार पुरेसा नसतो. ती सुविधा प्रत्यक्ष वापरासाठी तयार आहे का, तिची गुणवत्ता योग्य आहे का आणि ती संबंधित यंत्रणेकडून प्रभावीपणे चालविली जाईल का, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. ध्वजारोहण सोहळ्यातून विविध यंत्रणांमधील समन्वयाचा अनुभव मिळेल. ----- गोदावरी नदीची स्वच्छता, संवर्धनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? : सिंहस्थाच्या तयारीत गोदावरी नदीची स्वच्छता आणि संवर्धन यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. नदीत सांडपाणी जाणार नाही, कचरा साचणार नाही आणि घाट परिसर स्वच्छ राहील, यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे जाळे बळकट करण्यासाठी सुमारे एक हजार ४७५ कोटी रुपयांचा कार्यक्रम नियोजित आहे. तसेच त्र्यंबकेश्वरमध्येही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. यासोबत घाटांची स्वच्छता, निर्माल्य संकलन, कचरा व्यवस्थापन आणि एकल-वापर प्लॅस्टिकला प्रतिबंध अशा उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, नदीचे संवर्धन केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांतून शक्य नाही, तर नागरिक, भाविक, धार्मिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचा सहभागही तितकाच आवश्यक आहे. ---- सिंहस्थात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी काय नियोजन आहे? : तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उपलब्धता, स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक, कचरा वाहून नेणारी वाहने आणि त्वरित प्रतिसाद देणारी पथके यांचे नियोजन केले जात आहे. प्लॅस्टिकमुक्त तीर्थक्षेत्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पर्यायी साहित्याचा वापर, जनजागृती आणि नागरिकांचा सहभाग यावर भर आहे. सिंहस्थानंतरही घाट, नदी परिसर स्वच्छ राहण्यासाठी कार्यक्षम व्यवस्था निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे. ------- त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांसाठी कोणत्या सुविधा महत्त्वाच्या ठरणार आहेत? : त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता येथे भाविकांना सुलभ दर्शन, सुरक्षित हालचाल व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नदीघाट, रस्ते, पार्किंग, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यांसारख्या सुविधांबरोबरच गर्दीच्या प्रवाहाचे नियोजन केले जात आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अनावश्यक गर्दीत अडकावे लागू नये, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना शक्य तितक्या सुलभ सुविधा मिळाव्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध असावेत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. -- सिंहस्थाच्या तयारीत स्थानिक, व्यावसायिकांचा सहभाग कसा वाढवला जात आहे? : सिंहस्थाचे नियोजन हे केवळ एकट्या प्रशासनावर अवलंबून नाही. नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील नागरिक, व्यापारी, सेवा पुरवठादार, स्वयंसेवी संस्था आणि धार्मिक संघटना यांचा सहभाग त्याच्या यशासाठी महत्त्वाचा आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून पर्यटन, मार्गदर्शन, खाद्यसेवा, निवास आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये स्थानिकांना संधी उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जात आहे. -- सर्व विभागांमध्ये समन्वय राखण्याचे आव्हान कसे हाताळले जात आहे? : सिंहस्थाची व्याप्ती मोठी असल्याने एकाच विभागाच्या कामावर संपूर्ण आयोजन अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे नियमित आढावा, कामांची निश्चित उद्दिष्टे, वेळापत्रक, गुणवत्ता तपासणी आणि जबाबदाऱ्यांचे स्पष्ट वाटप यांना महत्त्व दिले जात आहे. संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवून अडचणी वेळेत सोडविण्याचा प्रयत्न आहे. काम पूर्ण झाले, एवढ्यावर न थांबता ते निर्धारित दर्जानुसार झाले आहे का, याची तपासणीही महत्त्वाची आहे. ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com