NSK26H34322
हिवरखेडा : अभियाना माहिती देताना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड आदी.
-----
चाराटंचाई काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा
डॉ. प्रदीप झोड : हिवरखेडा येथे चारा साक्षरता, संवर्धन अभियान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२ : आगामी काळात हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चारा उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी केले.
जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि जामनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हिवरखेडा येथे आयोजित चारा साक्षरता व संवर्धन अभियानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. के. चव्हाण होते.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कृष्णप्रिया गोशाळेच्या चारा गोदामाचे उद्घाटन आणि गोशाळेने तयार केलेल्या गोखरू व सेंद्रिय कंपोस्ट खताचे अनावरण करण्यात आले.
चारा संवर्धनाचे प्रात्यक्षिक
पशुपालकांना निकृष्ट चारा सकस करण्यासाठी युरिया प्रक्रिया कशी करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. श्रीकांत व्यवहारे यांनी सादर केले. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. स्वप्नजा लोखंडे यांनी केले. त्यांनी तालुक्यातील पशुपालकांनी चारा बियाण्यांची मागणी नोंदवावी, असे सांगितले. डॉ. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अमोल वराडे, श्रीकृष्णप्रिया गोशाळेचे संचालक दीपक पाटील यांनी परिश्रम घेतले. डॉ. अमोल वराडे (गोंडखेल) यांनी आभार मानले.
चौकट
पाणी बचतीवर भर
जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी पशुपालकांनी स्वतः चारा पिकांची लागवड करून उपलब्ध चाऱ्याची बचत व योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले. अमर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य यांनी पाणी व्यवस्थापन आणि पाणी बचतीचे महत्त्व विशद केले. सहाय्यक गट विकास अधिकारी कैलास काळे यांनी विकसित भारत रोजगार व आजीविका योजनेची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन केले.