जिल्ह्यात चारा निर्मितीला प्राधान्य

जिल्ह्यात चारा निर्मितीला प्राधान्य
Published on: 
उन्हाळ्याआधीच चारा टंचाईचा ‘कृती आराखडा’ जिल्हाधिकारी प्रसाद : १८ लाख पशुधनासाठी चारा उत्पादन, साठवणूक आणि वितरणावर भर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : बदलते हवामान, पावसातील अनिश्चितता आणि उन्हाळ्यातील चाऱ्याची वाढती गरज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने संभाव्य चारा टंचाई रोखण्यासाठी जून २०२७ पर्यंतचा कृती आराखडा तयार केला आहे. चारा उत्पादन वाढविणे, बियाण्यांचे वाटप, चारा साठवणूक, चारा बँकांची निर्मिती आणि मुरघास उत्पादनावर भर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्ह्यात १८ लाख एक हजार ८९७ पशुधन असून, त्यासाठी दरमहा दोन लाख सात हजार ३९३ टन चाऱ्याची आवश्यकता आहे. उपलब्ध चारा ५३ हजार ९७७ टन असून, तो सुमारे १२७ दिवस पुरू शकतो. संभाव्य टंचाई टाळण्यासाठी १७ हजार १६० लाभार्थ्यांना विविध चारा बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने चारा व्यवस्थापन ग्रामस्तरावर चारा व्यवस्थापनाचे आराखडे तयार करून पशुधनाची संख्या, चाऱ्याची गरज आणि उपलब्ध संसाधनांनुसार नियोजन केले जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये रब्बी हंगामातील चारा पेरणी, तर डिसेंबरमध्ये जमीन तयार करून चारा पिकांची लागवड करण्यात येईल. पडीक जमिनींचाही चारा उत्पादनासाठी वापर केला जाणार आहे. जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान चारा पिकांची कापणी, मुरघास निर्मिती आणि उपलब्ध चाऱ्याचे वितरण केले जाईल. मार्च ते जून या कालावधीत उन्हाळी चारा पिकांचे नियोजन आणि सुक्या चाऱ्याची साठवणूक करण्यावर भर राहणार आहे. चारा बँका, पर्यायी उत्पादनाला चालना चारा लागवडीसाठी अतिरिक्त बियाण्यांच्या मागणीकरिता तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रब्बी व उन्हाळी हंगामात चारा लागवड वाढविण्यासह गाळपेऱ्याच्या जमिनीवर चारा पिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी संस्था आणि बचतगटांच्या माध्यमातून चारा बँका उभारण्यात येतील. तसेच मुरघास, ॲझोला आणि हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. वन विभागाच्या सहकार्याने ग्रामवन व्यवस्थापन समित्यांमार्फत उपलब्ध वनसंपत्तीचे संरक्षण आणि नियोजनबद्ध वापर केला जाईल. तालुकानिहाय पशुधन संख्या, चाऱ्याची गरज आणि उपलब्ध साठ्याचा आढावा घेऊन टंचाईची संभाव्य ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. त्यानुसार चारा उत्पादन, साठवणूक आणि वितरणाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com