ॲंकर
चाऱ्याअभावी पशुधन जगविण्याचे संकट
पूर्व चांदवडमध्ये दुग्धव्यवसाय, मेंढीपालन अडचणीत
सकाळ वृत्तसेवा
चांदवड, ता. १६ : पावसाच्या अनियमिततेमुळे पूर्व चांदवडमधील शेतकऱ्यांसमोर पशुधन जगविण्याचे संकट उभे राहिले आहे. मका पीकाचा चारा उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. गाई-म्हशींसह शेळ्या-मेंढ्यांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून शेतकऱ्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागतो आहे.
निमोण, दरेगाव, डोंणगाव, वडनेर-वराडी, कानडगाव, कुंदलगाव, शिंगवे, वडगाव पांगू, कातरवाडी, रापली, कोकणखेड, मेसनखेडे, दुगाव, रायपूर, निंबाळके, उसवाड, डोंगरगाव आदी परिसरात चारा टंचाई जाणवत आहे. मागील वर्षी मका चारा मुबलक होता. काही शेतकरी चारा घेऊन जाण्याची विनंती करीत होते. यंदा मात्र स्वतःच्या जनावरांसाठी चारा मिळेल की नाही, अशी चिंता आहे. उपलब्ध चारा विकत घेण्यासाठी मोठा खर्च होत आहे. त्यात वाहतुकीचा खर्चही वाढत आहे. त्यामुळे पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कठीण जात आहे.
पशुधन संकटात
शेतीचे उत्पन्न अनिश्चित असल्याने अनेकांनी दुग्धव्यवसाय सुरू केला. काहींनी कर्ज काढून गाई-म्हशी घेतल्या. तरुणांनी मेंढीपालनाचा आधार घेतला. मात्र, चारा टंचाईमुळे या व्यवसायांचेही गणित बिघडले आहे. पुरेसा चारा न मिळाल्यास दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेळ्या-मेंढ्यांच्या संगोपनाचा खर्चही वाढला आहे. पशुधन हे अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. मात्र, चारा विकत घेण्याचा खर्च परवडत नसल्यास जनावरे विकण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे शासनाने बाधित गावांचे सर्वेक्षण करून चारा टंचाईचा आढावा घ्यावा. पात्र शेतकऱ्यांना चारा खरेदीसाठी थेट बँक खात्यावर अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.
कोट
मका पीक व्यवस्थित आले नाही. त्यामुळे चारा मिळणे कठीण झाले आहे. मेंढीपालनातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, चारा विकत घ्यावा लागत आहे. शेतीचे नुकसान आणि पशुधन जगविण्याचे संकट, अशा दुहेरी कोंडीत सापडलो आहोत. शासनाने चारा खरेदीसाठी थेट खात्यावर अनुदान द्यावे. अन्यथा पशुधन विकण्याची वेळ येईल.
राकेश आहिरे, पशुपालक