टुडे ४, मेन फिचर (शहर - जिल्हा कॉमन)
(स्केच वापरता येईल)
---
सणासुदीत भेसळखोरांना दणका; ६६ लाखांचा साठा जप्त
दसरा ते दिवाळीदरम्यान २९ ठिकाणी तपासणी; तेल, सुकामेवा आणि मसाल्यांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याचा फायदा घेत भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पदार्थ बाजारात विक्रीसाठी आणले जाण्याची शक्यता असते. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने दसरा ते दिवाळी या कालावधीत जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत तब्बल २९ ठिकाणी कारवाई करीत एकूण ६६ लाख ६४ हजार ४३५ रुपये किमतीचा संशयित खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये तेल, सुकामेवा आणि विविध प्रकारच्या मसाल्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
सणासुदीच्या दिवसांत खाद्यतेल, सुकामेवा, मिठाई, फराळ आणि विविध मसाल्यांना मोठी मागणी असते. ग्राहकांची वाढती गर्दी आणि खरेदीची लगबग लक्षात घेता बाजारात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली. दसरा ते दिवाळी या कालावधीत जिल्ह्यातील विविध आस्थापना आणि विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यातून विविध ठिकाणचा मोठ्या प्रमाणातील साठा जप्त करण्यात आला.
मसाल्यांचा ५४ लाखांचा साठा जप्त
या कारवाईत सर्वाधिक साठा विविध प्रकारच्या मसाल्यांचा आढळून आला. तब्बल १८ हजार २२६ किलो मसाले जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत ५४ लाख ८१ हजार २६० रुपये आहे. याशिवाय ६०९ किलो सुकामेवा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सहा लाख १९ हजार ८० रुपये आहे. तसेच ३ हजार २२३.४ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. या तेलाची किंमत पाच लाख ६४ हजार २९५ रुपये आहे. या तिन्ही प्रकारच्या खाद्यपदार्थांची एकत्रित किंमत ६६ लाख ६४ हजार ४३५ रुपये असून, एकूण २९ ठिकाणी तपासणी व कारवाई करण्यात आली.
चौकट
फराळ विक्रेत्यांना परवाने बंधनकारक
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळ तयार करून विक्री करणारे व्यावसायिक, कॅटरिंग व्यावसायिक तसेच घरगुती फराळ तयार करून देणाऱ्यांनाही अन्न व औषध प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. मोठ्या प्रमाणात फराळ तयार करून त्याची विक्री करणाऱ्यांनी आवश्यक अन्न व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. गल्लोगल्ली फराळ तयार करून विक्री करणाऱ्यांनाही फूड वेंडिंग परवाने देण्यात आले आहेत. दरम्यान, कोणत्याही ठिकाणी उघड्यावर अनधिकृतपणे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून विक्री केली जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
ग्राफ
खाद्यपदार्थ..............जप्त साठा (किलो)..................किंमत
खाद्यतेल..............३,२२३...................५ लाख ६४ हजार २९५
सुकामेवा..............६०९.........................६ लाख १९ हजार ८०
मसाले................१८,२२६.................. ५४ लाख ८१ हजार २६०
एकूण................२२,०५८.................६६ लाख ६४ हजार ४३५
.......कोट
दिवाळीच्या काळात नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचितांना मिठाई किंवा अन्य खाद्यपदार्थ भेट देण्याची परंपरा आहे. मात्र, भेट दिले जाणारे पदार्थ नाशवंत असल्यास त्यांच्या साठवणुकीकडे आणि सेवनाच्या कालमर्यादेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मिठाई किंवा नाशवंत पदार्थ भेट देताना तसेच त्यांचे सेवन करताना निर्धारित वेळेतच ते खावेत.
- दिनानाथ शिंदे, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन