राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘नवदुर्गा सन्मान’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘नवदुर्गा सन्मान’
Published on: 
फोटो : H32617 नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित ‘नवदुर्गा सन्मान’ सोहळ्याप्रसंगी बीजमाता राहीबाई पोपेरे, संजय गोडबोले आदींसह पुरस्कारर्थी महिला. सकस माती टिकली तरच अन्नसुरक्षा राहीबाई पोपेरे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ‘नवदुर्गा सन्मान’ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : रासायनिक खते आणि तणनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून, त्याचे गंभीर परिणाम भविष्यातील अन्नसुरक्षेवर होऊ शकतात. अन्नधान्य पिकवणारी मातीच नष्ट झाली, तर अन्नासाठी अन्य देशांवर अवलंबून राहण्याची वेळ येईल. त्यामुळे सेंद्रिय शेतीचा अवलंब करून गावठी बियाणांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले. नाशिक शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बीजमाता राहीबाई पोपेरे, संत सेवा संघाचे संस्थापक संजय गोडबोले गुरुजी यांची उपस्थिती होती. शंकराचार्य संकुलातील कुर्तकोटी सभागृहात हा सोहळा झाला. राहीबाई पोपेरे म्हणाल्या की, अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी भागात बालपणापासून शेतीशी नाते जोडले गेले. पारंपरिक बियाणांचा वापर होत असताना घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले होते; मात्र शेतीत रासायनिक निविष्ठांचा वापर वाढल्यानंतर कुटुंबातील लहान मुले आजारी पडू लागली. त्यानंतर गावठी बियाणे जतन करून बीजबँक उभारली. आज राज्याच्या विविध भागांतून शेतकरी या बियाणांसाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सोनाली तेलंग, ऊर्मिला नाथानी, पूनम पाटील, मृदुला बेळे, रितू शर्मा, पल्लवी उटगी, ऋषिका पटेल आणि मिताली कोळी यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी संजय गोडबोले यांनी संघाचे कार्य, राष्ट्रविचार आणि मानवी कर्तव्याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा संघचालक कैलास साळुंखे, शहर संघचालक डॉ. विजय मालपाठक आदींसह मान्यवर उपस्थित होते. विवेक सराफ यांनी प्रास्ताविक केले. आदित्य भातंबरेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ---चौकट शेतीचे भविष्य मातीच्या आरोग्यावर अवलंबून अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी जमिनीचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य नाही. शेतातील माती जिवंत आणि सुपीक राहिली, तरच भविष्यात अन्नधान्याचे उत्पादन टिकून राहील. त्यामुळे शेतकरी आणि संशोधकांनी पारंपरिक बियाणांचे महत्त्व ओळखून सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन राहीबाई पोपेरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com