वनपालासह महिला वनरक्षक निलंबित
---
अनेर अभयारण्यात गांजाशेती प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. ४ : जैवविविधतेबद्दल प्रसिद्ध असलेल्या अनेर अभयारण्याचे गांजाच्या वनात रुपांतर झाल्याची बाब गांभीर्याने घेत वन विभागाने वनपालासह महिला वनरक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर वन विभागात चर्चेला उधाण आले असून, कर्मचाऱ्यांचा बळी देऊन अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
अनेर अभयारण्यातील सुमारे आठ हेक्टर क्षेत्रावर बहरलेली गांजाची शेती डीआरआय आणि सीबीएनच्या संयुक्त कारवाईत नुकतीच उद्धवस्त करण्यात आली. त्यामुळे अभयारण्यांतर्गत असलेल्या वनक्षेत्राच्या देखभालीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे आरोप करण्यात आले. त्याची दखल घेऊन वनपाल बिपीन महाजन व महिला वनरक्षक आरती गोडसे यांना निलंबित करण्यात आले.
मोठ्या कारवाईमुळे अनेर अभयारण्य चर्चेच्या केंद्रस्थानी आले असले, तरी तेथे गांजाची शेती होत असल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही पोलिसांच्या कारवाईत वेळोवेळी राखीव वनक्षेत्रात गांजाची शेती सुरू असल्याचे दिसून आले आहे. अभयारण्याच्या दुर्गमतेचा गैरफायदा घेऊन गांजाची शेती केली जात असल्याचे उघड आहे. वनक्षेत्राचे संरक्षण करणे, नियमित गस्त घालणे आणि अवैध कृत्यांना आळा घालणे ही वनकर्मचाऱ्यांची प्राथमिक जबाबदारी मानली जात असताना, अभयारण्याच्या हद्दीत मोठ्या क्षेत्रावर गांजाची लागवड उघडकीस आली. त्यामुळे कारवाई होईलच, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वन कर्मचाऱ्यांनी गांजाच्या शेतीची माहिती दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करू नये, केवळ कर्मचाऱ्यांचा बळी देऊन इतरांचा बचाव करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.