पिंपळगाव : व्यापाऱ्याचे टोमॅटोच्या मापात पाप; शेतकऱ्यांनी केला भांडाफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fraud in weight scale from trader while buying tomatoes in pimpalgaon market committee

व्यापाऱ्याचे टोमॅटोच्या मापात पाप; शेतकऱ्यांनी केला भांडाफोड

sakal_logo
By
दिपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : शेतकऱ्याला मारहाण, शिवीगाळीपर्यंत मजल पोचलेले पिंपळगाव बाजार समितीतील काही मस्तवाल व्यापारी टोमॅटो खरेदी करताना मापात पाप करीत लूटमार करीत असल्याची बाब आज जागृत शेतकऱ्यांमुळे आज उघड झाली. वजनकाट्याला दगड लावून २० किलोच्या क्रेटमागे दोन किलो टोमॅटो शेतकऱ्यांकडून जास्त घेतला जात होता. दक्ष शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याच्या या चलाखीचा भांडाफोड केला आहे. खर्चही वसूल न होणारा घसरलेला दर आणि त्यात व्यापाऱ्यांकडून अशी लूटमार होत असल्याने शेतकरी प्रचंड संतप्त झाले होते. या बदमाश व्यापाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन आता पिंपळगांव बाजार समितीच्या प्रशासनासमोर आहे.

सौदा झालेल्या दरात कपात करून पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांशी रडीचा डाव खेळ जात होता. ही लबाडी सुरू असताना आता मापात पाप करण्याचा प्रकार समोर आला आहे. शिवरे (ता.चांदवड) येथील योगेश वक्ते या शेतकऱ्याने टोमॅटोच्या चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो विक्रीला आणण्यापूर्वी योगेश वक्ते यांनी अगोदर शेतातच वजनकाट्याने २० किलो वजनाचे टोमॅटो क्रेट भरले. ४३ क्रेटमध्ये ८५० किलो टोमॅटो घेऊन ते पिंपळगाव बाजार समितीत आले. ३४१ रुपये प्रतिक्रेट दराने एम. एस. वर्मा या व्यापाऱ्याने वक्ते यांचे टोमॅटो खरेदी केले.

हेही वाचा: राज्यात १५ ऑक्टोबरपासून बॉयलर पेटणार!

वजन काट्याला दगड…

सौदा झाल्यानंतर टोमॅटो पोचविण्यासाठी वक्ते हे एम. एस. वर्मा व्यापाऱ्याच्या गाळ्यावर पोचले. तेथील काट्यावर २० किलो टोमॅटोचे वजन १८ किलो भरू लागले. तेव्हा चक्रावलेल्या तक्तेंना वजनकाट्यात गडबड असल्याचा संशय बळावला. त्यांनी सहकाऱ्यांना घेत वजनमापाचे पारडे व टोमॅटो क्रेटची अदलाबदल केल्यावर ही तफावत लक्षात आली. तातडीने वजनकाटा उलटा केल्यानंतर वजनमापाच्या पारड्याखाली दगड लावल्याचे दिसले. चोरीचा पर्दाफाश होताच संतप्त शेतकऱ्यांनी वर्माला जाब विचारला. त्यावेळी त्याची बोबडीच वळाली.

बदनामी टाळण्यासाठी कारवाई व्हावी

या घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. व्यापारी वर्मा हा दररोज सुमारे पाचशे क्रेट टोमॅटो खरेदी करायचा. वजन काट्याच्या चलाखीतून सरासरी बाजारभावानुसार दररोज किमान दहा हजार रुपयांची शेतकऱ्यांची लूट होत होती. दरम्यान, शेतकऱ्यांना मारहाण, शिवीगाळ, ठरलेल्या दराने पैसे न देणे अशा प्रकारच्या व्यापाऱ्यांच्या मनमानीविरोधात पिंपळगाव बाजारसमिती प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आली आहे. वजनकाट्याला दगड लावून शेतकरी लुटीच्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आशिया खंडात नावलौकिक असलेल्या पिंपळगाव बाजार समितीची ठकबाज व्यापाऱ्यांमुळे बदनामी होत आहे. अशा व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.

हेही वाचा: गोदेच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशाराटोमॅटो व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या लुटीच्या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल. व्यापारी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. सौदा झालेल्या दरातच शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी व्यापारी व आडतदार यांना ताकीद दिली आहे. शेतकरी हिताच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
- आमदार दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समिती.

मी वीस किलो टोमॅटो क्रेटचे शेतातच वजन केले होते. पण व्यापाऱ्यांच्या वजनकाट्यावर मात्र ते कमी दाखवत होते. शंका आली म्हणून तपासणी केली. त्यावेळी वजनाच्या पारड्याला दगड लावला होता. शेतकऱ्यांची ही लूट थांबविण्यासाठी बाजार समितीने कारवाई करावी.
- संपत वक्ते, टोमॅटो उत्पादक, शिवरे.

loading image
go to top