फोटो : B14849 (जुना आहे)
पंचवटी: मोफत कर्करोग तपासणी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, डाॅ. शेफाली भुजबळ आदी
--
मोफत कर्करोग तपासणी अभियानास प्रारंभ
पंचवटी ता. १३ : कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही आधुनिक तपासणी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हिमांशू रॉय फाउंडेशनने महाराष्ट्र कर्करोग तपासणी अभियान सुरू केले आहे. पंचवटीतील नामको हॉस्पिटल व टीझर लॅब्सच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते करण्यात आले.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे या उपक्रमाला पाठिंबा दिला. नामको हॉस्पिटल येथे आयोजित कार्यक्रमास भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डाॅ. शेफाली भुजबळ, नामको चॅरीटेबलचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, लेखक तथा हिमांशू रॉय फाउंडेशनचे सहसंस्थापक अमीश त्रिपाठी, फाउंडेशनच्या संस्थापक, संचालिका भावना रॉय, नामको हॉस्पिटलचे सचिव शशीकांत पारख, जनरल मॅनेजर समीर तुळजापुरकर आदी उपस्थित होते. डॉ. शेफाली भुजबळ यांनी सांगितले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मोफत आणि आधुनिक तपासणी सुविधा पोहोचणे आवश्यक आहे. मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, हिमांशू रॉय यांच्या नावाने भावना रॉय पुढे नेत असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. विशेष व्हिडिओ संदेशात मंत्री छगन भुजबळ म्हणाले, हिमांशू रॉय हे लोकप्रिय पोलीस अधिकारी होते. त्यांनी स्वतः कर्करोगाशी धैर्याने लढा दिला. त्यांच्या स्मृतीचा सन्मान करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या नावाने सामाजिक कार्य करणे हा आहे.