शेतकऱ्यांना चार हजारांचे
चाऱ्याचे बियाणे मोफत
दीपावलीच्या मुहुर्तावर वाटपास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.५ : चारा टंचाई निवारणासाठी पशुसंवर्धन विभागाने ३ कोटींचे एक लाख १७ हजार किलो चारा बियाणे मोफत वाटण्यास सुरुवात केली आहे. किमान तीन ते चार वेळा पाणी देण्याची क्षमता असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ४ हजारांचे बियाणे पूर्णत: मोफत देण्यात येत आहे.
जिल्ह्यात विविध प्रकारची १८ लाख जनावरे आहेत, त्यांना महिन्याकाठी एक लाख ९४ हजार टन ओला व सुका चारा लागतो. खरिप हंगामातील चारा जानेवारी २०२७ पर्यंत पुरेल इतकाच असल्याने फेब्रुवारीपासून चारा टंचाई निर्माण होईल. त्यादृष्टीने कृषी विभागाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे चारा बियाण्याची मागणी केली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे जिल्ह्यात ३ कोटींचे चारा बियाणे वाटपास मंगळवारी (ता.३) सुरुवात झाली. जिल्ह्यात रब्बीचे एकूण १.११ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यात १० हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी होते. पण यंदा हे क्षेत्र ३० हजारांपर्यंत वाढवून चारा टंचाईवर मात करण्याचे नियोजन सुरु आहे. पाणी उपलब्ध असलेल्या निफाड, दिंडोरी, कळवण, मालेगाव, देवळा, सिन्नर या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना वाटप चालू आहे. याद्वारे साधारणत: एक महिना पुरेल इतका ओला चारा उपलब्ध होणार आहे.
…
कोट
जानेवारीपश्चात चारा बियाण्याची गरज भासल्यास ‘सीएसआर’ च्या माध्यमातून बियाणे उपलब्ध करुन देण्यात येईल. चारा टंचाई भासणार नाही, यादृष्टीने नियोजन चालू आहे.
- डॉ. संजय शिंदे, सहायक पशुसंवर्धन अधिकारी (नाशिक)
---------