दुष्काळग्रस्त १५ तालुक्यांत
मोफत धान्यवाटपाला गती
अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : जिल्ह्यातील १५ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा लाभ विनाविलंब मिळावा, तसेच शेतकरी व स्थलांतरित मजुरांना धान्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी जिल्हा पुरवठा यंत्रणेमार्फत उपाययोजनांना गती देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.
शासन निर्णयानुसार, जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांमुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये शासनाने ट्रिगर-१ (प्रथम कळ) व ट्रिगर-२ (द्वितीय कळ) लागू करून विविध सवलती व उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर व अन्य गरजू लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील तालुकास्तरीय शासकीय धान्य गोदामांमध्ये एकूण २ लाख ८३ हजार ४५२ क्विंटल अन्नधान्याची साठवण क्षमता आहे. माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२६ साठी आवश्यकतेनुसार २ लाख ७२ हजार ८२६ क्विंटल गहू, तांदूळ व ज्वारी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ९४ हजार २२१ क्विंटल अन्नधान्याची उचल पूर्ण झाली असून, उर्वरित धान्याची उचल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
चौकट
स्थलांतरित लाभार्थ्यांनाही धान्य मिळणार
खरीप हंगामातील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमधून रोजगारासाठी शहरी, निमशहरी किंवा जवळच्या भागात स्थलांतर करणाऱ्या शेतमजूर व नागरिकांना धान्य मिळण्यात अडचण येऊ नये, यासाठी पोर्टेबिलिटी सुविधेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.