दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मोफत अन्नधान्य वितरण
जिल्ह्यातील ११ लाख ७३ हजार लाभार्थ्यांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १९ : दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर व गरजू नागरिकांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा पुरवठा यंत्रणेमार्फत विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील ११ लाख ७३ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात आले आहे, अशी जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी दिली.
जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य विनाविलंब उपलब्ध करून दिले जात आहे. जिल्ह्यातील शासकीय अन्नधान्य गोदामांची एकूण क्षमता एक लाख ३७ हजार ४०० क्विंटल असून, ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी गहू, तांदूळ, ज्वारी व मका या अन्नधान्याच्या एकूण एक लाख ४८ हजार ५७४ क्विंटल उचल करण्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ९२ हजार २५ क्विंटल अन्नधान्याची उचल पूर्ण झाली आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना मिळून एकूण ११ लाख ७३ हजार १६७ लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले आहे. यामध्ये अंत्योदय योजनेतील चार लाख ४५ हजार ५२३ आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील सात लाख २७ हजार ६४४ लाभार्थ्यांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्याचे अन्नधान्य वितरण सध्या सुरू आहे.
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या परंतु अन्नधान्याची मागणी करणाऱ्या पात्र व्यक्तींचा, विहित निकषांनुसार आणि उत्पन्नाच्या मर्यादेत, अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेत तात्काळ समावेश करून तसेच सदस्याचे आधार सिडिंग पूर्ण करुन त्यांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश क्षेत्रिय स्तरावरील पुरवठा यंत्रणेस देण्यात आले आहेत. तसेच, दुष्काळग्रस्त भागातील शेतमजूर व नागरिकांचे रोजगार किंवा पाण्यासाठी होणारे स्थलांतर लक्षात घेता, स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या नेहमीच्या दुकानाशिवाय इतर कोणत्याही सोयीच्या रास्तभाव दुकानातून अन्नधान्य उचलता यावे, यासाठी पोर्टेबिलीटी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणतेही पात्र कुटुंब अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी पुरवठा यंत्रणा सतर्क असून, अन्नधान्य वितरण व संबंधित उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. पवार यांनी दिली.