धुळे : टुडे पान १ साठी..
--
हरभरा, मसूर बियाण्यांवर अनुदान
--
पोर्टल अर्ज प्रक्रिया सुरू; जिल्ह्यास १५०० मिनी किट
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : रब्बी हंगामात हरभरा आणि मसूर लागवडीची तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आणि सेवा संकल्प अभियानांतर्गत हरभरा व मसूर पिकांचे बियाणे शंभर टक्के अनुदानावर दिले जाणार आहे. जिल्ह्यात एकूण एक हजार ५०० बियाणे मिनीकिट वाटपाचे उद्दिष्ट असून पात्र शेतकऱ्यांनी १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी केले.
-
रब्बी हंगामात कडधान्य पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादनात वाढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यात २० हजार किलो बियाणे मोफत वितरित केले जाईल. यात हरभरा बियाण्यांचे एक हजार मिनीकिट (प्रत्येक मिनीकिटमध्ये १६ किलो बियाणे) आणि मसूर बियाण्यांचे ५०० मिनीकिट (प्रत्येक मिनीकिटमध्ये आठ किलो बियाणे) वाटप केले जाणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर अर्ज सादर करावे. ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत १९ ऑक्टोबर आहे. यात अडचण आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सहाय्यक कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जगताप यांनी केले.