esakal | VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍युकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis image

VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍युकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : राज्‍यासह जिल्‍ह्‍यात आढळणाऱ्या कोरोना बाधितांमध्ये बी १.६१७ स्‍ट्रेन आढळत असून, यामुळे गुंतागुंत वाढत आहे. म्‍यूकोरमायकोसिस या फंगल इन्‍फेक्‍शनमुळे मधूमेही, रोगप्रतिकार शक्‍ती कमकुवत असलेल्‍या रुग्‍णांमध्ये धोका निर्माण झाला आहे. भुरशीजन्‍य आजाराचा फैलाव डोळे, वरील जबड्यापासून थेट मेंदूपर्यंत होतोय. अशा वेळी काही रुग्‍णांवर शस्‍त्रक्रीया करत डोळे काढावे लागत आहेत.

म्‍यूकोरमायकोसिस हा संधी साधु भुरशीजन्‍य आजार असून, बाधित रुग्‍णांच्‍या शरीरात वेगाने पसरत असल्‍याचे काही प्रकरणांतून समोर आले आहे. कोरोनाची लागण झाल्‍यानंतर जितक्‍या लवकरच यासंदर्भातील निदान करत उपचार घेतला, तितकाच जीवावरील धोका कमी करता येऊ शकतो, असे तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे. मधुमेही किंवा रोगप्रतिकार शक्‍ती कमी असलेल्‍या रुग्‍णांमध्ये या आजारामुळे हाणी होण्याचा धोका अधिक आहे.

इन्‍फेक्‍शन वाढल्‍यास इंजेक्‍शनद्वारे नियंत्रण

अशा रुग्‍णांमध्ये प्रसार पहिल्‍या टप्‍यात लक्षात आल्‍यास कुठलाही अवयव निकामी होण्याच्‍या आत इन्‍फेक्‍शन आटोक्‍यात आणता येऊ शकते. परंतु दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्‍तरापर्यंत फैलाव पोहोचला असेल तर इंजेक्‍शन देत नियंत्रण मिळविले जाते. साधारणतः दहा ते बारा हजार रुपये प्रति दिवस याप्रमाणे २१ दिवस इंजेक्‍शन द्यावे लागत असल्‍याने आजारावरील उपचार काहीसा खर्चिक आहे.

शस्‍त्रक्रीयांच्‍या प्रमाणात वाढ

गेल्‍या काही दिवसांत अशा रुग्‍णांच्‍या संख्येत वाढ होते आहे. काही रुग्‍णांचे शस्‍त्रक्रीया करून डोळे काढावे लागत आहेत. तर काहींचा वरचा जबडा काढायची वेळ येते आहे. रुग्‍ण संख्येत झालेल्‍या वाढीमुळे अशा स्‍वरूपाच्‍या शस्‍त्रक्रीयांचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे.

कोरोनाच्‍या बी १.६१७ स्‍ट्रेनचे काही घातक परीणाम दिसायला लागले आहेत. म्‍युकॉरमायकोसिस या फंगल इन्‍फेक्‍शनमुळे डोळे, वरचा जबडा व मेंदूपर्यंत भुरशीजन्‍य आजाराचा फैलाव होतो आहे. मधुमेही, रोगप्रतिकार शक्‍ती कमी असलेल्‍या रुग्‍णांनी कोरोनाची लक्षणे जाणवता तातडीने तपासणी करत उपचार प्रक्रियेत सहभागी झाल्‍यास धोका कमी होऊ शकतो.

-डॉ.नितीन चिताळकर, कान-नाक-घसा तज्‍ज्ञ

loading image