SGR26B07602
सोनगीर : व्हाॅलीबाॅल स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देताना अविनाश महाजन.
--------
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत
गडचिरोलीचा संघ विजयी
सोनगीर, ता. २३ : पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत गडचिरोलीच्या संघाने विजेतेपद पटकावले. तर मुंबईचा संघ उपविजेता ठरला. येथील एन. जी. बागूल हायस्कूलच्या मैदानात तब्बल ४८ तास चाललेल्या या स्पर्धेत राज्यातील तब्बल ३० संघांनी सहभाग घेतला.
वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थी, अनाथाश्रमात तसेच येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. येथे प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धा झाल्याने सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, गडचिरोली, शिरपूर आदींसह राज्यातील विविध शहरातील अनेक संघ सहभागी झाले होते. विजेत्या गडचिरोलीच्या लाॅर्डस मेटल संघाला ३१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, उपविजेता मुंबईच्या भाग्य अकरा संघाला २१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, पुण्यातील एबीएसएफ संघाला तृतीय क्रमांकाचे ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले. पंच म्हणून धुळ्यातील राजेंद्र बारी, गुड्डू, प्रा. नरेंद्र पाटील, किशोर लोहार आदींनी काम पाहिले. जय बजरंग मित्र मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत १६१ दात्यांनी रक्तदान केले. धुळ्यातील के. सी. अजमेरा ब्लड बँकेने संयोजन केले.
येथील श्रीराम सेनेतर्फे धुळ्यातील संस्कार मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत एक दिवस राहून त्यांना मिष्टान्न दिले. माता वैष्णोदेवी ग्रुप तर्फे धुळ्यातील मातोश्री वृद्धाश्रमाला एक महिन्याच्या किराणा देण्यात आला. येथील जय अंबे गरबा मंडळ व मोरया गणेश मित्र मंडळातर्फे मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था केली. अविनाश भाऊ माझा मित्र परिवारातर्फे येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.