पान-१-------
३६-२
गजू घोडकेच्या विरोधात
खंडणीचा गुन्हा दाखल
------------
२५ हजाराची मागणी करत विक्रेत्यास धमकी
------------
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता.१५ : दिवाळी सणानिमित्त कपडे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्याकडे २५ हजार रुपयांची खंडणी मागून दमदाटी केल्याप्रकरणी संशयित गजू घोडके याच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शालिमार परिसरातील नेपाळी कॉर्नर येथे घडली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत संशयिताने विक्रेत्याच्या खिशातील कपडे विक्रीचे आलेले तीन ते साडेतीन हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
-------------
तक्रारदार ऋतिक चंद्रकांत काशीद (भगवतीनगर, कोळीवाडा, जुने नाशिक) यांचा शालिमार येथील नेपाळी कॉर्नर परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. ७ नोव्हेंबरला सकाळी ६ ते सायंकाळी सातच्या दरम्यान तसेच ९ नोव्हेंबरला सायंकाळी संशयित गजू घोडके याने त्यांच्याकडे येऊन २५ हजार रुपयांची मागणी केली. हप्त्याचे पैसे न दिल्यास दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.
पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने तक्रारदाराच्या खिशात असलेले कपडे विक्रीचे तीन ते साडेतीन हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. ''तुला जीवे मारून त्याच्या दुप्पट पैसे वसूल करीन,'' अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी शनिवारी (ता.१४) ऋतिक काशीद यांच्या तक्रारीवरून संशयित गजू घोडके यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाकडून त्यास मंगळवार (ता.१७) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वीही त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत.
---------------------