मेन बातमी पान ३
सहा तासांचा ठिय्या... जिल्हाधिकाऱ्यांचीच अधिकाऱ्याविरुद्ध गांधीगिरी!
चार महिन्यांपासून भू-संपादनाची फाईल रखडली; सुट्टीच्या दिवशी अधिकाऱ्याच्या दालनातच ठाण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१४ : सरकारी कार्यालयात एखादे छोटेसे काम करून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना किती हेलपाटे मारावे लागतात, याचा अनुभव आपण नेहमीच घेतो. ‘आज होईल, उद्या या’ या उत्तरांनी नागरिकांचा संयम संपतो; पण काम काही मार्गी लागत नाही. याच लालफितीच्या कारभाराचा अनुभव यंदा चक्क जिल्हाधिकाऱ्यांनाच आला. फरक एवढाच की, त्यांनी केवळ सूचना देऊन थांबण्याऐवजी थेट संबंधित अधिकाऱ्याच्या दालनातच ठिय्या मांडला. तब्बल सहा तास पुस्तक वाचत बसून त्यांनी अनोख्या पद्धतीने गांधीगिरी केली आणि प्रशासनातील रखडलेल्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या या अनोख्या पवित्र्यामुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ उडाली.
जिल्हा प्रशासनाकडे सध्या सिंहस्थ कुंभमेळ्यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी भूसंपादनाची कामे सुरू आहेत. कामांचा वाढता व्याप लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या कामांचे वर्गीकरण करत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. त्यापैकी एका अधिकाऱ्याकडे भूसंपादनाशी संबंधित महत्त्वाचे काम देण्यात आले होते. मात्र, चार महिने उलटले तरी या कामाची फाईल पुढे सरकण्याचे नाव घेत नव्हती.
जिल्हाधिकाऱ्यांकडून वारंवार विचारणा झाली, की ‘आज पूर्ण करतो’, ‘उद्या करतो साहेब’ अशी उत्तरे मिळत होती. आश्वासनांची ही मालिका संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनीच वेगळा मार्ग निवडला.
शनिवारी (ता. १४) सुट्टीचा दिवस असतानाही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी थेट संबंधित अधिकाऱ्याचे दालन गाठले. जिल्हाधिकारी स्वतः दालनात आल्याचे पाहून अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा पवित्रा वेगळाच होता. आज कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण झाल्याशिवाय येथून हलायचे नाही, असा निर्धार करून त्यांनी दालनातील एका कोपऱ्यात खुर्ची टाकली आणि ठाण मांडले.
विशेष म्हणजे, या सहा तासांच्या ठिय्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पुस्तक वाचन केले. दुसरीकडे, संबंधित अधिकाऱ्याला भूसंपादनाच्या कामात येणाऱ्या अडचणी समजून घेत मार्गदर्शनही केले. अशा प्रकारे सूचना, पाठपुरावा आणि प्रत्यक्ष उपस्थिती अशा तिन्ही माध्यमांतून त्यांनी काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला.
इतर अधिकारी-कर्मचारी आवाक्!
सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयीन कामांसाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. वरिष्ठांच्या सूचनांनंतरही एखादी फाईल मार्गी लावण्यासाठी चार-चार महिने लागत असतील, तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. अखेर एका फाईलसाठी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच सहा तास दालनात बसून राहण्याची वेळ येणे, ही प्रशासकीय यंत्रणेतील दिरंगाईची गंभीर बाब मानली जात आहे.
शनिवारची सुट्टी असूनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या अनोख्या गांधीगिरीची चर्चा महसूल विभागात रंगली. ही बातमी इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. वरिष्ठांच्या एका आदेशासाठी महिनोनमहिने वाट पाहणाऱ्या फाईलींना आता जिल्हाधिकाऱ्यांच्या या गांधीगिरीमुळे तरी गती मिळणार का, हा खरा प्रश्न आहे.
फोटो क्रमांक :- एच-35040