गणेश गिते : सार्वजनिक जीवनातील नवे प्रभावशाली पर्व

गणेश गिते : सार्वजनिक जीवनातील नवे प्रभावशाली पर्व
Published on: 
फोटो -NSK26H33978 गणेश गिते : सार्वजनिक जीवनातील नवे प्रभावशाली पर्व ---------------------------------------------- नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदापासून ते आता थेट नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदापर्यंतचा गणेश गिते यांचा प्रवास त्यांच्या सार्वजनिक जीवनातील एका नव्या व प्रभावशाली पर्वाचा शुभारंभ मानला जात आहे. - प्रा. शरद काकड महानगरपालिकेच्या राजकारणात कार्यरत असताना गणेश गिते यांनी शहरातील गुंतागुंतीचे नागरी प्रश्न, विकासकामांचे अचूक नियोजन, निधीचे योग्य व्यवस्थापन आणि प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः २०२०-२१ आणि २०२१-२२ या सलग दोन वर्षांत स्थायी समिती सभापतिपदाची धुरा सांभाळताना त्यांनी शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर भरीव काम केले. महापालिकेच्या कारभारात अत्यंत कळीची मानल्या जाणाऱ्या या समितीत त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची साक्ष देणारी ठरली. त्यांच्या या विकासाभिमुख आणि लोककल्याणकारी कामाची दखल घेत २०२१ मध्ये ''नाशिक सिटीझन फोरम'' तर्फे त्यांना मानाच्या ''कार्यक्षम नगरसेवक'' पुरस्काराने सन्मानित केले होते. नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे, हा त्यांच्या राजकीय कार्यशैलीचा स्थायीभाव राहिला आहे. विविध राजकीय प्रवाहांमधून मार्ग काढत आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी आपली संघटनात्मक बांधिलकी कायम राखली. राजकीय पटलावर परिस्थिती बदलत असताना उपलब्ध संधींचा सदुपयोग करून घेणे आणि नव्या लोककल्याणकारी जबाबदाऱ्यांसाठी सदैव तत्पर राहणे, हेच एका मुरब्बी नेत्याचे लक्षण असते. गणेश गिते यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाचे हेच प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती गणेश गिते यांच्यासाठी एका नव्या व मोठ्या जबाबदारीची नांदी आहे. बाजार समिती ही केवळ शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यासपीठ नसून शेतकरी, व्यापारी, आडतदार, हमाल आणि लाखो कामगार यांच्या आर्थिक उदरनिर्वाहाशी जोडलेली अत्यंत संवेदनशील संस्था आहे. बाजार समितीतील दैनंदिन व्यवहार अधिक पारदर्शक करणे, बळीराजाला त्याच्या घामाचा योग्य व न्याय मोबदला मिळवून देण्यासाठी यंत्रणा सक्षम करणे, आर्थिक शिस्त लावणे आणि कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, तसेच बाजार समितीचे सर्व व्यवहार ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने करण्याच्या दिशेने त्यांनी मांडलेली भूमिका शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. महानगरपालिकेतील समृद्ध प्रशासकीय अनुभव आणि राजकीय संघर्षातून मिळालेला प्रदीर्घ अनुभव बघता गणेश गिते यांच्यासाठी बाजार समितीचे अध्यक्षपद ही केवळ एक राजकीय पुनर्रचना नसून, आपल्या कर्तृत्वातून आणि जनसेवेतून लोकांचा विश्वास संपादन करण्याची एक सुवर्णसंधी आहे. गिते यांच्यात असलेली जनसेवेची तळमळ, सेवाभावी वृत्ती व कार्यक्षम कार्यपद्धती या गुणांच्या बळावर त्यांना भारतीय जनता पार्टीने मोठी संधी दिल्यास पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला व नाशिकच्या विकासाला चालना मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.