Ganeshotsav 2022 : मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याची लगबग | latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sculptors putting final touches on finished Ganesha idols.

Ganeshotsav 2022 : मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याची लगबग

जुने नाशिक : पंधरा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. बाप्पाची मूर्ती साकारण्याची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १० टक्के मूर्तींवर मूर्तिकारांकडून अखेरचा हात फिरविला जात आहे. विक्रेते आणि नागरिकांकडून मूर्ती बुकिंग करणेदेखील सुरू झाले आहे. (Ganeshotsav 2022 Final touch on ganesha idols nashik Latest Marathi News)

चिमुकल्यापासून ज्येष्ठांपर्यंत आकर्षण असलेल्या गणेशोत्सवास बुधवार (ता. ३१)पासून सुरवात होणार आहे. त्यानिमित्ताने गणेशमूर्ती साकारण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित १० टक्के तयार मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याचे काम मूर्तिकारांकडून सुरू आहे.

परिस्थिती सामान्य असल्याने यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

त्यामुळे विक्रेते आणि नागरिकांकडून गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. मूर्ती तयार करणाऱ्यांमध्येदेखील समाधानाचे वातावरण आहे. गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाल्याने मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले होते.

रंग तसेच अन्य कच्चा माल भाववाढ झाल्याने मूर्तीच्या दरांमध्ये यंदा ३० टक्के दरवाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. दगडूशेठ हलवाई आणि लालबागचा राजा गणेशमूर्ती अधिक मागणी असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. यासह फेटाधारी, पगडीधारी, मयुरेश्वर, वारकरी अशा विविध प्रकार आणि आकाराच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

हेही वाचा: दिव्यांगाच्या पैठणी कलाकारीने भुजबळ भारावले!

सरकारच्या निर्णयाने गणेशभक्तांमध्ये चैतन्य

गेली दोन वर्षे अतिशय साध्या पद्धतीने विविध निर्बंधांच्या अधीन राहून गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ गणेशभक्त तसेच मंडळांवर आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेशित केले आहे.

कुठल्या प्रकारचे निर्बंध त्यांच्यावर लादू नयेत, असे आदेश विविध शासकीय विभागांना दिले आहेत. त्याचप्रमाणे केवळ चार फूट गणेशमूर्तीची अट शिथिल करून कितीही मोठी मूर्ती स्थापना करण्याची सूट दिली आहे. निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने गणेशभक्त तसेच मंडळांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

बुकिंगला सुरवात

गणेशोत्सवास १५ ते १६ दिवसांचा अवधी असला तरी आतापासूनच गणेशमूर्ती बुकिंगला सुरवात झाली आहे. या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण अधिक असल्याने मूर्तींची कमतरता भासण्याची शक्यता आहे.

त्यामुळे घरगुती स्थापनेसाठी गणेशमूर्ती तसेच विक्रेत्यांकडून आतापासूनच गणेशमूर्ती बुकिंग करून ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत ७० ते ८० टक्के मूर्ती बुक झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

हेही वाचा: जागृती विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह दोघांना लाच घेतांना अटक