
Ganeshotsav 2022 : गणरायांपाठोपाठ आज गौरीचे आगमन
नाशिक : विघ्नहर्त्या मंगलमूर्तीचे विधिवत, वाजतगाजत आगमन झाल्यावर आता शनिवारी (ता. ३) गौरीचे विधिवत आगमन होत आहे. मुखवट्यापासून सुगडे, खडी व अन्य साहित्याच्या खरेदीसाठी शुक्रवारी बाजारात महिला वर्गाची मोठी गर्दी उसळली होती. राज्याच्या वेगवेगळ्या भागात ज्येष्ठा गौरीचे पूजन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. (Ganeshotsav 2022 today Gauri Puja Nashik Latest Marathi News)
अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला वर्गाकडून हे व्रत केले जाते. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या या उत्सवात घरात किंवा देवघरात गौरीचे जोडीने आगमन होते. अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन तर मूळ नक्षत्रावर गौरीचे विधीवत विसर्जन केले जाते. हे तीन दिवसीय व्रत महिला वर्ग मोठ्या भक्तिभावाने करतात.
आर्थिक कुवतीनुसार सोन्या- चांदीचे, तर काही ठिकाणी आकर्षक मुखवटे आणून गौरींना साजशृंगार करण्याची पद्धत आहे. कागदावर केवळ गौरीचे चित्र काढूनही काही ठिकाणी पूजन केले जाते, तर काही ठिकाणी नदीपात्रातून खडे व दगड आणूनही पूजन करण्याची पद्धत आहे. गौरीच्या नैवेद्यासाठी सोळा भाज्या, डांगराची फुले, कमलपुष्प आदींच्या खरेदीसाठी बाजारात खरेदीसाठी महिला वर्गात मोठा उत्साह होता.
गौरी लक्ष्मी आवाहन
अनुराधा नक्षत्रावर गौरी, लक्ष्मीचे आवाहन केले जाते. शनिवारी (ता. ३) रात्री १०. ५७ पर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभरात गौरी, लक्ष्मी घरी आणाव्यात. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी, लक्ष्मीचे पूजन केले जाते. रविवारी (ता. ४) रात्री १०.५७ पर्यंत ज्येष्ठा नक्षत्र असल्याने सूर्योदयापासून दोन तीन तासांत गौरी व लक्ष्मीचे पूजन करावे. मूळ नक्षत्रावर गौरी, लक्ष्मीचे विसर्जन केले जाते. सोमवारी (ता. ५) मूळ नक्षत्र असल्याने रात्री ८ वाजून सहा मिनिटांपर्यंत गौरीचे विसर्जन करावे, असे आवाहन धर्मशास्त्राचे अभ्यासक पंडित नरेंद्र धारणे यांनी केले आहे.
वेगवेगळ्या प्रथा, परंपरा
माहेवाशीण म्हणून पूजन केली जाणाऱ्या गौरी काही ठिकाणी गणपतीची आई म्हणून येते, ती आपल्या बाळाचे कौतुक पाहण्यासाठी तर कधी ही जगन्माता ज्येष्ठा- कनिष्ठा अशा बहिणीच्या रूपातही येते. कोकणस्थ व कऱ्हाडी ब्राह्मणांकडे खड्यांच्या गौरीची प्रतिष्ठापना केली जाते. देशस्थांच्या घरी उभ्या गौरी असतात. विदर्भात गौरींना महालक्ष्मी म्हटले जाते. यासाठी पितळ, प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा चांदीचे मुखवटे तयार केले जातात.