esakal | गणेशोत्सवामुळे बाजारात चैतन्य!  पाच महिन्यांत प्रथमच कोट्यवधीची उलाढाल 
sakal

बोलून बातमी शोधा

market ganesh.jpg

कोरोनामुळे लॉकडाउन व लॉकडाउनमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गणेशोत्सवामुळे चांगलीच तरतरी आली. पाच महिन्यांत प्रथमच पूर्वीसारखा व्यवसाय झाल्याने बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः मिठाई, फूलबाजार, घरगुती डेकोरेशन या किरकोळ सामान विक्रीसह गुढीपाडवा, अक्षयतृतीयेचा हुकलेला मुहूर्त वाहन, घरे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करून साधला. 

गणेशोत्सवामुळे बाजारात चैतन्य!  पाच महिन्यांत प्रथमच कोट्यवधीची उलाढाल 

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनामुळे लॉकडाउन व लॉकडाउनमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गणेशोत्सवामुळे चांगलीच तरतरी आली. पाच महिन्यांत प्रथमच पूर्वीसारखा व्यवसाय झाल्याने बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः मिठाई, फूलबाजार, घरगुती डेकोरेशन या किरकोळ सामान विक्रीसह गुढीपाडवा, अक्षयतृतीयेचा हुकलेला मुहूर्त वाहन, घरे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करून साधला. 

पाच महिन्यांत प्रथमच कोट्यवधीची उलाढाल 

मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर तब्बल तीन महिने शहर पूर्णपणे बंद होते. त्यानंतर सम-विषम प्रमाणात दुकाने सुरू करून व्यवसायाचा पुनश्‍च हरिओम करण्यात आला. तरी मार्चपूर्वीची स्थिती बाजारात नव्हती. गणेशोत्सवात शासनाने काही निर्बंध घातले, ते पाळून भाविक उत्साहाने सहभागी झाले. सार्वजनिक मंडळांचे प्रमाण यंदा घटले. घरगुती गणपती मात्र बसले. गणेशमूर्तीबरोबरच डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वस्तूंची बाजारपेठ फुलली. 

मिठाई विक्री तेजीत 
मोदक, प्रसाद, गुलाबजाम, पेढे, बासुंदी, बर्फी, खवा आदी मिठाईला मोठी मागणी होती. बर्फी ३४० रुपये किलो, काजू कतली ३००, गुलाबजाम २०० रुपये, रसगुल्ला अडीचशे रुपये, हलवा ९० रुपये किलो, तर खवा १६० रुपये प्रतिकिलो दराने विकले गेले. शहरात यातून साधारण एक कोटीची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महिनाभरापासून शहरात फुलांचा तुटवडा जाणवत आहे. परंतु उत्सवानिमित्त फुले उपलब्ध झाली. फुलांचा तुटवडा निर्माण होईल या शंकेने फूलबाजारात पहाटेपासूनच गर्दी उसळली होती. दुर्वा, झेंडूच्या फुलांना अधिक मागणी होती. 

वाहने, घरे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मागणी 
पाच महिन्यांत अक्षयतृतीया, गुढीपाडवा हे दोन महत्त्वाचे सण गेल्याने या मुहूर्तावर ज्यांना खरेदी करता आली नाही, त्यांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर खरेदी केली. टीव्ही, फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशिन खरेदीमुळे इलेक्ट्रॉनिक्स बाजारात मोठी उलाढाल झाली. तसेच वाहन, गृहखरेदीला अनेकांनी पसंती दिली. वाहन, इलेक्ट्रिकल वस्तू व घरे खरेदीतून बाजारात साधारण दहा कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. 

संपादन- मनिष कुलकर्णी

loading image
go to top