सर्व आवृत्तींसाठी
(फोटो : विकी कदम)
गंगा-गोदावरी मंदिर यंदा २१ महिने खुले
---
पेशवेकालीन इतिहास अन् कुंभपर्वाशी अतूट नाते
- सातशे वर्षांची परंपरा
- गोदावरी मातेच्या अवतरणाची आख्यायिका
- बारा वर्षांतून दर्शनाची संधी
प्रशांत भरवीरकर : सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिकच्या धार्मिक वैभवात रामतीर्थाजवळील श्री गंगा-गोदावरी मंदिराचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. गोदावरीच्या अवतरणाची पौराणिक आख्यायिका, गौतम ऋषींच्या तपश्चर्येची स्मृती, पेशवेकालीन इतिहास आणि बारा वर्षांतून एकदा दर्शनासाठी खुले होण्याची परंपरा अशा अनेक वैशिष्ट्यांनी हे मंदिर समृद्ध आहे. मंदिर ३१ ऑक्टोबर २०२६ ला धर्मध्वजारोहण सोहळ्याने उघडले. या पर्वाची अधिकृत सांगता २४ जुलै २०२८ ला होणार आहे. सातशे वर्षांची धार्मिक परंपरा असल्याचे सांगितले जाणारे हे मंदिर एरवी सिंहस्थ कुंभमेळ्यात १२ महिनेच खुले असते; परंतु यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात संपूर्ण पर्वाच्या काळात म्हणजेच साधारणपणे २१ महिने भाविकांसाठी खुले राहील. बारा वर्षांनंतर भाविकांना गंगा माता, गोदावरी माता आणि गौतम ऋषी यांच्या प्राचीन मूर्तींचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
रामतीर्थाच्या उत्तरेस गोदावरीच्या तीरावर दगडी बांधकामात उभे असलेले हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही; तर गोदावरीच्या माहात्म्याशी जोडलेला सांस्कृतिक वारसा आहे. मंदिराच्या प्राचीनत्वाबाबत सुमारे ७०० वर्षांची परंपरा सांगितली जाते. मात्र, मंदिराच्या सध्याच्या वास्तूशी संबंधित ऐतिहासिक नोंदींमध्ये पेशवेकालीन काळाचा विशेष उल्लेख आढळतो. इ. स. १७७५ मध्ये गोपिकाबाई पेशवे यांनी मंदिरात सभामंडप उभारून दिल्याची नोंद आहे. पूर्वी गौतम ऋषींची मूर्ती उघड्यावर असल्याने ऊन-पावसाचा मारा सहन करावा लागत होता. सभामंडपाच्या उभारणीनंतर मूर्तींचे संरक्षण होण्यास मदत झाली. गोदावरी नदीच्या काठावर पेशवेकाळात झालेल्या धार्मिक वास्तूंच्या उभारणीच्या परंपरेतील हे एक महत्त्वाचे उदाहरण मानले जाते.
गौतम ऋषींच्या तपश्चर्येची आख्यायिका
या मंदिराचे धार्मिक महत्त्व समजून घेण्यासाठी ‘गोदावरी’च्या अवतरणाची पौराणिक कथा महत्त्वाची ठरते. त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषींचे वास्तव्य होते. एकदा त्यांच्या शेतात आलेल्या गायीला दूर करण्याच्या प्रयत्नात तिचा मृत्यू झाला. गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांनी आपल्या जटांमधून गंगेला पृथ्वीवर अवतरित होण्याची आज्ञा दिली. ब्रह्मगिरीवर प्रकट झालेली ही गंगा पुढे गोदावरी म्हणून ओळखली जाऊ लागली, अशी पुराणपरंपरेतील कथा आहे. त्यामुळे गोदावरीला दक्षिण गंगा असेही संबोधले जाते.
या आख्यायिकेमुळे गौतम ऋषी, गंगा आणि गोदावरी यांचे नाते केवळ पौराणिक कथेत मर्यादित नाही, तर या मंदिरातील मूर्तींच्या माध्यमातून ते साकार झाल्याचे भाविक मानतात. ‘गोदावरी’च्या अवतरणाची स्मृती जपणारे हे मंदिर म्हणूनच विशेष श्रद्धेचे स्थान आहे.
यंदाच्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात रंगरंगोटी, फरशांची दुरुस्ती आणि पाणीगळती रोखण्याची कामे करण्यात आली आहेत. धर्मध्वजारोहणाच्या मुहूर्तावर धार्मिक विधी झाल्यावर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या सिंहस्थात नाशिकला येणाऱ्या भाविकांना ‘गोदावरी’च्या माहात्म्याशी जोडलेल्या या ऐतिहासिक मंदिराचे दर्शन घेता येणार आहे.
कोट
‘गोदावरी’ला दक्षिण गंगा मानले जाते. वृद्ध गंगा हेही तिचेच एक नाव आहे. हे गंगा गोदावरी मातेचे मंदिर १२ वर्षांनी खुले होते. कुंभमेळा काळात भाविकांना दर्शनासाठी खुले असते. नित्य पूजाविधी होतात.
- सतीश शुक्ल, अध्यक्ष, सिंहस्थ समिती, गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ
मंदिराची वैशिष्ट्ये एका दृष्टिक्षेपात
- स्थान : रामतीर्थ अर्थात रामकुंडाच्या उत्तरेस, गोदावरी नदीच्या काठावर.
- प्राचीन परंपरा : सुमारे ७०० वर्षांची धार्मिक परंपरा असल्याचे सांगितले जाते.
- ऐतिहासिक संदर्भ : इ. स. १७७५ मध्ये गोपिकाबाई पेशवे यांनी सभामंडप उभारून दिला.
- मूर्ती : गंगा माता, गोदावरी माता आणि गौतम ऋषी यांच्या मूर्ती.
- पौराणिक संदर्भ : गौतम ऋषींची तपश्चर्या आणि गोदावरीच्या अवतरणाची आख्यायिका.
- दर्शन परंपरा : सिंहस्थ कुंभपर्वात १२ वर्षांच्या अंतराने मंदिर दीर्घकाळ खुले केले जाते.
- विशेष महत्त्व : ‘गोदावरी’च्या धार्मिक माहात्म्याशी आणि सिंहस्थ पर्वाशी जोडलेले वैशिष्ट्यपूर्ण मंदिर.
---
दर्शनपरंपरेला विशेष महत्त्व
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा हा ‘गोदावरी’च्या तीरावर भरत असल्याने नदीला या पर्वात केंद्रस्थानी स्थान आहे. गुरू ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश हा सिंहस्थ पर्वाचा ज्योतिषशास्त्रीय आधार मानला जातो. या काळात देशभरातील साधू-संत, आखाडे आणि भाविक ‘गोदावरी’च्या तीरावर एकत्र येतात. रामतीर्थ आणि गोदाघाट परिसरातील धार्मिक विधी, स्नानपर्व आणि दर्शनपरंपरेला विशेष महत्त्व प्राप्त होते. अशा वेळी गोदावरीच्या अवतरणाशी संबंधित गंगा-गोदावरी मंदिर खुले होणे, हे या पर्वाच्या धार्मिक अनुभवातील महत्त्वाचे अंग ठरते.