टूडे साठी
------------
दोनशे कोटींची गंगापूर थेट जलवाहिनी पुन्हा रखडली
जिंदालला १४ नोव्हेंबरचा अंतिम अल्टिमेटम, ४.२२ कोटींचा दंड
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान टाकण्यात येत असलेल्या नवीन थेट जलवाहिनीचे काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण झालेले नाही. ३१ ऑक्टोबरची डेडलाईन उलटूनही केवळ क्रॉस कनेक्शनचे काम शिल्लक राहिल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ठेकेदार कंपनीला अंतिम नोटीस बजावली आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करा, अन्यथा कारवाई, असा स्पष्ट इशारा देण्यात आला असून १५ नोव्हेंबरला या वाहिनीची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे.
२००३ मध्ये टाकलेली सिमेंटची जुनी जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे २०० कोटी रुपये खर्चून नवीन लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. निविदेत जिंदाल (जेडब्ल्यूएल) कंपनी पात्र ठरली. एकूण १२.५ किलोमीटर लांबीपैकी १२.३५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. बारा बंगला परिसरातील झोपडपट्टी वाचवण्यासाठी वाहिनीची दिशा बदलावी लागली. त्यामुळे केंद्रालगतच्या क्रॉस कनेक्शनचे काम अडकले. महापालिकेने यापूर्वीच सप्टेंबर २०२५ मध्ये कंपनीला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली होती. तरीही काम रखडल्याने दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली.
---------------चौकट
ठेकेदाराला ठोठावलेला दंड
- १ मे २०२६ पासून- दंडात्मक कारवाईला सुरुवात.
- १ ते १५ मे- दररोज १ लाख रुपये दंड.
- १६ मे पासून- दररोज अडीच लाख रुपये दंड
- एकूण दंड- ४ कोटी २२ लाख २५ हजार रुपये.
----------कोट-----------
ऑक्टोबरअखेर काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. तरीही काम झाले नाही. त्यामुळे अंतिम नोटीस बजावून १४ नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, महापालिका.
--------------------------