गांजाची पॅकिंग करताना सरपंच आढळला
---
सांगवी पोलिसांना पाहून पळाला
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. ६ : गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने पॅकिंग करणाऱ्या सरपंचासह त्याच्या साथीदारांनी पोलिसांना पाहून धूम ठोकली. घटनास्थळावरून पोलिसांनी सुका गांजा, दुचाकी, मोबाईल आदी मिळून सुमारे १४ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मध्य प्रदेश-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात जामन्यापाणी (ता. शिरपूर) येथे ५ नोव्हेंबरला दुपारी पावणेपाचला ही कारवाई करण्यात आली. सांगवी येथील पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना जामन्यापाणी शिवारातील वनजमिनीवर गांजा उगवून विक्रीसाठी पॅकिंग केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या आदेशावरून उपनिरीक्षक हेमंत खैरनार, उपनिरीक्षक कचरे यांनी पथकासह घटनास्थळी छापा टाकला. तेथे गांजाची पॅकिंग करताना तीन जण आढळले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच तिघांनी पळ काढला. काही अंतरापर्यंत पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, अतिदुर्गम भागातील टेकड्यांआड ते दिसेनासे झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून ओला व सुका गांजा, एक दुचाकी, तीन मोबाईल, असा १४ लाख ३९ हजार दहा रुपयांचा गांजा जप्त केला.
सरपंचाची करामत
गांजा लागवडीतील प्रमुख संशयित म्हणून रेवा किसन बारेला- पावरा (रा. फलिया दुगानी, बडवानी, मध्यप्रदेश) याचे नाव समोर आले आहे. तो सेंधवा रस्त्यावरील फलिया दुगानी गावाचा सरपंच आहे. त्याच्यासह दोन साथीदारांविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे तपास करीत आहेत. मध्य प्रदेशात राहून महाराष्ट्राच्या हद्दीत गांजाची शेती करायची व कायद्याच्या कक्षेपासून दूर राहायचे, अशा कार्यपद्धती असणाऱ्या टोळ्यांचा अंमली पदार्थ उत्पादन आणि विक्रीत सहभाग असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. सांगवी पोलिसांनी थेट सरपंचाविरोधात गुन्हा दाखल केल्याने या गुन्ह्यातील आंतरराज्यीय टोळी उघडकीस येण्याची शक्यता आहे.