Nashik News : निसर्गनगरीला कचऱ्याची बाधा! दुर्गंधी वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

garbage

Nashik News : निसर्गनगरीला कचऱ्याची बाधा! दुर्गंधी वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक महापालिका हद्दीतील म्हसरूळ गावाला डोंगर, झाडी हिरवळ आणि शेती असल्यामुळे निसर्गनगरी म्हणून संबोधित करण्यात येते, परंतु याच निसर्गनगरीला ‘श्रीरामनगर’ नावाचा परिसर गालबोट लावतो. या परिसराला कचऱ्याची बाधा झाल्याने दुर्गंधी वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

म्हसरूळ गावापासून पुढे हरिकृपा लॉन्स समोरून कॅनॉलला लागून श्रीरामनगरकडे एक रस्ता जातो. हाच रस्ता पुढे बोरगड एअरफोर्स स्टेशनला जाऊन मिळतो. हरिकृपा लॉन्सपासून श्रीरामनगरपर्यंतचा हा रस्ता कच्चा जरी असला तरी पूर्वी तो अतिशय सुंदर वाटायचा. आजूबाजूला झाडी, मधून कच्चा रस्ता आणि कॅनल मधून वाहणारे नितळ पाणी असा अतिशय मनमोहक देखावा असायचा.

परंतु हल्ली या ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसायला लागले आहेत. हा कचऱ्याचा ढीग आता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की, या रस्त्यावरून पायी चालणेदेखील असह्य होते. या कचऱ्याच्या ढीगामध्ये बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, कपड्यांच्या चिंध्या, उष्टे अन्न असा घरगुती कचरा तर आहेच परंतु त्याचबरोबर आजूबाजूच्या औद्योगिक वसाहतीच्या कारखान्यातील कचऱ्याचादेखील समावेश आहे.

एवढेच नाही तर मेलेली जनावरे सुद्धा याच ठिकाणी आणून टाकली जातात. मृत वासरे आणि पारडू प्लॅस्टिकच्या गोणीत भरून येथे फेकून दिले जाते. भटकी कुत्री या मृत जनावरांची लचके तोडून सर्वत्र घाण पसरवितात. यामुळे परिसरात रोगराईचे वातावरण पसरलेले आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Nashik NMC News : 10 हजार कोव्हीशिल्डची मागणी

घंटागाडीचे क्वचितच दर्शन

सदर परिसरातील नागरिकांशी चर्चा केली असता, असे आढळून आले की घंटागाडी या ठिकाणी क्वचितच येते आणि आलीच तर ती अतिशय कमी वेळासाठी थांबते. त्यामुळे परिसरातील साचलेला कचरा उचलण्याची जबाबदारी नेमकी कोणाची असे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते.

सदर परिस्थितीमुळे श्रीरामनगर परिसरामध्ये आजाराचे प्रमाणदेखील सर्वोच्च आहे. त्यामुळे स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक मोहिमेअंतर्गत लाखो रुपयांचा खर्च नेमका जातोय कुठे, असा सवाल संतप्त नागरिकांकडून विचारला जातो आहे.

हेही वाचा: Nashik News : NMCने 6 दिवसात तोडल्या 76 नळ जोडण्या