गरुड बंधूंच्या जामिनावर आज सुनावणी
उत्तर महाराष्ट्रातील शाळांची पोलिसांकडून झाडाझडती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शेंदुर्णी (ता. जामनेर) शिक्षण संस्थेचा अध्यक्ष संजय गरुड आणि सहसचिव दीपक गरुड याच्या जामीन अर्जांवर उद्या (ता. ७) सुनावणी होणार आहे. दोघेही सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यास २७ जुलैच्या रात्री सोलापूर जिल्ह्यातील फार्महाऊसवरून नाशिक शहर गुन्हेशाखेने अटक केली होती. त्यानंतर संस्थेचे सहसचिव आणि संजय गरुड याचा भाऊ दीपक गरुड यालाही अटक करण्यात आली. दोघांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. संजय गरुड याच्या अर्जावर शनिवारी (ता. ३) युक्तिवाद झाला असून, त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. दीपक गरुड याच्या जामीन अर्जावरही उद्याच सुनावणी होणार आहे.
दरम्यान, शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी सहायक आयुक्त सचिन बारी आणि संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके नियुक्त केली आहेत. या पथकांकडून धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतील शाळांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. गुन्ह्यात समाविष्ट तत्कालीन शिक्षणाधिकारी तसेच काही अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळले आहेत. काही संशयित शिक्षणाधिकारी पसार असून, त्यांचा शोध गुन्हेशाखेची पथके घेत आहेत.