गरुड बंधू, हिंगोणेकरांची दिवाळी कारागृहातच
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण : जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २८ : राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शेंदुर्णी (ता. जामनेर) शिक्षण संस्थेचा अध्यक्ष संजय गरुड, सहसचिव दीपक गरुड तसेच जळगावचा माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांचा जामीन अर्ज नाशिकरोडचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. केदार जोशी यांनी फेटाळून लावला. गरुड बंधू जुलै महिन्यापासून नाशिकरोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. गरुड बंधूंसह हिंगोणेकर या तिघांची दिवाळी कारागृहात साजरी होणार आहे.
-------
खानदेशातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या जामनेरच्या शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष संजय गरुड यास २७ जुलैला सोलापूर जिल्ह्यातून नाशिक शहर गुन्हेशाखेने अटक केली होती. याच संस्थेचा सहसचिव व संजय गरुडचा भाऊ दीपकलाही अटक करण्यात आली. दोघांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. गरुड बंधुंच्या जामिनावर युक्तिवाद होऊन त्यावरील सुनावणी बुधवारी (ता.२८) झाली. नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. केदार जोशी यांनी गरुड बंधूंचे जामीन अर्ज फेटाळून लावले.
बनावट शालार्थ आयडीमध्ये सर्वाधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे जळगाव जिल्ह्यातील असून, यात लक्षणीय प्रमाण हे गरुड यांच्या शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे आहेत. याच मुद्द्यावर सरकार पक्षातर्फे गरुड बंधुंच्या जामिनाला कडाडून विरोध करण्यात आला होता. बचाव पक्षाने गरुड बंधूंचे वय आणि त्यांना असलेल्या आरोग्याच्या तक्रारींची कारणे देत जामिनाची मागणी केली होती. परंतु न्या.जोशी यांनी दोघांचेही जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. यामुळे त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
शालार्थ आयडीप्रकरणी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपासकामी दोन सहायक आयुक्त सचिन बारी व संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली पथके नेमली आहे. या पथकांकडून उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगावमधील शाळांची झाडाझडती सुरू आहे. तर गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळून लावले आहेत. यातील काही संशयित शिक्षणाधिकारी पसार असून, त्याचा शहर गुन्हेशाखेची पथके कसून शोध घेत आहेत.
....
१६-१
हिंगोणेकरला दिलासा नाही
जळगावचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याचाही जामीन अर्ज नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. हिंगोणेकर यांच्याच कार्यकाळात सर्वाधिक शालार्थ आयडीचे वाटप करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. ६५ वर्षीय हिंगोणेकर यांनी जामिनासाठी धाव घेतली परंतु न्यायालयाने फेटाळून लावत त्यांनाही दणका दिला आहे.
........