गरुड बंधूंचा कारागृहातील मुक्काम कायम
शालार्थ आयडी घोटाळा : जामिनावर २६ ला सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला शेंदुर्णी (ता. जामनेर) शिक्षण संस्थेचा अध्यक्ष संजय गरुड, सहसचिव दीपक गरुड यांच्या जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत (ता. २६) पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे गरुड बंधूंचा जुलैपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम कायम आहे.
खानदेशातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या जामनेरच्या शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यास २७ जुलैच्या रात्री सोलापूर जिल्ह्यातील फार्म हाउसवरून नाशिक शहर गुन्हे शाखेने अटक केली होती. संस्थेचा सहसचिव व संजय गरुडचा भाऊ दीपक यालाही अटक करण्यात आली. सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. गरुड बंधूंच्या जामिनावर गुरुवारी (ता. २२) सुनावणी होती. या वेळी गरुड बंधूंना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तसेच सरकार पक्षाचे सहायक अभियोक्ता आणि गरुडचे वकीलही न्यायालयात उपस्थित होते. परंतु गरुड बंधूंच्या जामिनावरील सुनावणी कामकाजाच्या व्यस्ततेमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे ही सुनावणी सोमवारी (ता. २६) होणार आहे.