पान-४ साठी
YEO26B27032
येवला : गौरी गणपती स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस वितरणप्रसंगी आयोजक कुणाल दराडे. समवेत परीक्षक व विजेत्या महिला.
-------------------
भागवत, डालकरी, काथवटे ठरल्या विजेत्या
गौरी सजावट स्पर्धा ः कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे विजेत्यांचा गौरव, ७० हून अधिक महिलांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ६ : कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे झालेल्या गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. घरगुती गौराई पुढे अप्रतिम देखावे सादर करून परीक्षकांना भुरळ घालत संजना भागवत यांनी प्रथम, राधिका डालकरी यांनी द्वितीय तर सविता काथवटे यांना तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेतील सर्व विजेत्यांसह सहभागी महिला स्पर्धकांना सन्मानपूर्वक बक्षीस वितरण करण्यात आले.
गौरी-गणपती उत्सवाला आधुनिकता, सामाजिक जाणीव आणि कलात्मकतेची जोड देत कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे सलग सहाव्या वर्षी गौराई सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यंदा शहरातील सत्तरहून अधिक कुटुंबांनी सहभाग घेतला. महिलांनी विविध धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक विषयांवर आकर्षक देखावे साकारून कलागुणांचा अनोखा आविष्कार घडविला.
या स्पर्धेचा निकाल जाहीर करून बक्षीस वितरण करण्यात आले. कुणाल दराडे, डॉ. कविता दराडे, संगीता पटेल, अदिती पटेल, ज्योती खंदारे, शीतल कोळस, काजल कुक्कर, अंकिता मानेकर आदी पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेत संजना वीर भागवत यांनी साकारलेल्या ‘काशी विश्वनाथ वाराणसी’ या देखाव्यात काशी विश्वनाथ मंदिरासह वाराणसीच्या गंगा घाटाचे वातावरण कलात्मक पद्धतीने उभे केले. त्यांच्या देखाव्याला प्रथम क्रमांक मिळाला. राधिका अनिल डालकरी यांनी श्रीकृष्ण लीला या देखाव्यात श्रीकृष्ण रासलीला, दहीहंडी, छप्पन भोग आणि द्रौपदी वस्त्रहरण या प्रसंगांचा सुरेख संगम साकारत द्वितीय क्रमांक पटकावला. सविता विशाल काथवटे यांच्या ‘गरुड’ या देखाव्यास तसेच अनुली जय भागवत यांच्या ‘श्री केदारनाथ’ या देखाव्यास तृतीय क्रमांक मिळाला. त्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. याशिवाय सारिका विकास वराडे ‘जेजुरी’, वृषाली महेश वडनेरे ‘श्रीकृष्ण लीला’, अनिता कैलास रोडे ‘वारकरी दिंडी’ आणि तनिष्का सचिन ढोपरे ‘छावा’ यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेत महिलांनी विविध सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले होते. विशेषता लेक वाचवा लेक शिकवा, लेकीचे स्वागत, जेजुरी, वारकरी दिंडी, छावा यांसारख्या धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक विषयांसोबतच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेवर आधारित देखाव्यानेही स्पर्धेची रंगत वाढविली. काही कुटुंबांनी गौरीची मनोहारी सजावट करत पारंपरिक भक्तिभावाला आधुनिक कल्पकतेची जोड दिली होती. सर्वच महिलांनी अतिशय कलात्मकतेने देखावे सादर केल्याने सहभागी सर्व ७० महिलांना बक्षीस देण्यात आले.
---------
कोट
महिलांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळावे, याच उद्देशाने फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे. यंदा ७० हून अधिक कुटुंबांनी सहभाग घेतला. महिलांनी स्वतः संशोधन करून आणि कल्पकतेचा वापर करून सुंदर व कलात्मक देखावे साकारले. भविष्यातही असे उपक्रम सुरूच ठेवू.
- कुणाल दराडे, युवा नेते, येवला
----------