फोटो : H34708
गवळवाडी पर्यायी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी होणार
जिल्हाधिकारी प्रसाद यांचे आदेश; सरकारला अहवाल होणार सादर स
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : बहुचर्चित परिक्रमा मार्ग (बाह्य रिंगरोड) प्रकल्पात मखमलाबाद- गोवर्धन- विंचूर गवळी अलाइनमेंटला पर्याय म्हणून गवळवाडी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रत्यक्ष पाहणीबाबत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ ाला (एमएसआयडीसी) आदेश दिले आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतरचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार असल्याचा दावा बाधित शेतकऱ्यांनी केला.
रिंगरोड प्रकल्पात मखमलाबाद ते गोवर्धन आणि विंचूर गवळी या परिसरातील शेतकऱ्यांचा प्रस्तावित अलाइनमेंटला सातत्याने विरोध आहे. शेतकऱ्यांच्या घरे, विहिरी, बोअरवेलचे तसेच सुपीक जमिनींचे नुकसान टाळण्यासाठी गवळवाडीचा पर्यायी मार्ग व्यवहार्य असल्याची शेतकऱ्यांची भूमिका आहे. या संदर्भात बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची वारंवार भेट घेत चर्चाही केली. याच मागणीला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांना गवळवाडी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करत उपलब्ध पर्यायांचा तांत्रिक अभ्यास करावा. तसेच त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादरीकरणाच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चर्चेप्रसंगी दीपक हगवणे, सुदर्शन पाटील, पंकज खताळे, भारत पिंगळे तसेच रिंगरोड बाधित शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
--- चौकट
वाढीव मोबदला द्यावा : गायकर
अंतिम निवाडे जाहीर झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांना २५ टक्के वाढीव मोबदल्याचा लाभ देण्यात यावा. तसेच सर्व गावांतील सर्वोच्च खरेदीखतांचे दर विचारात घेत जिरायत, हंगामी बागायत आणि बागायत जमिनींचे नव्याने सर्वेक्षणाचे निर्देश देण्यात आले आहेत. या फेरसर्वेक्षणाचा आधार घेत सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय्य व वाढीव मोबदल्यासाठी पुरवणी निवाडा जाहीर करण्यात यावा, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी केली आहे.