Latest Marathi News | ‘MVP’च्‍या सरचिटणीसपदाची सूत्रे ॲड. ठाकरेंच्‍या हाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MVP Meeting

‘MVP’च्‍या सरचिटणीसपदाची सूत्रे ॲड. ठाकरेंच्‍या हाती

नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. ३०) पहाटे पाचपर्यंत चालली. महिला गटाच्‍या दोन जागांसाठी मतमोजणीचा सर्वाधिक वेळ लागला. दरम्‍यान, ॲड. नितीन ठाकरे यांनी मध्यवर्ती कार्यालय गाठत सरचिटणीसपदाची सूत्रे आपल्‍या हाती घेतली.

यानंतर त्‍यांनी नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सर्वांचे अभिनंदन केले. संस्‍थेच्‍या विकासासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन त्‍यांनी या वेळी केले. मावळते अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत शुभेच्‍छा दिल्‍या. (General Secretary post of MVP Advocate nitin thackeray Nashik Latest Marathi News)

परिवर्तन पॅनलचे प्रमुख ॲड. नितीन ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी संस्‍थेच्या मध्यवर्ती कार्यालयात जाऊन सरचिटणीसपदाची सूत्रे हाती घेतली. यानंतर इमारतीतील सभागृहात नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक पार पडली.

या वेळी नवनिर्वाचित सरचिटणीस ॲड. ठाकरे यांच्‍यासमवेत सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, लक्ष्मण लांडगे, संस्थेचे प्रमाणित लेखापरीक्षक राजाराम बस्ते यांच्‍यासह सेवक संचालक डॉ. संजय शिंदे, चंद्रजित शिंदे, शिक्षणाधिकारी उपस्‍थित होते.

बैठकीसोबत कार्यकारिणीच्‍या कामकाजास प्रारंभ करण्यात आला. दरम्‍यान, संस्थेचे मावळते अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी सरचिटणीस ॲड. ठाकरे यांच्‍यासह पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

मतमोजणी अन्‌ क्षणचित्रे...

* दिंडोरीचे प्रवीण जाधव यांचा सर्वाधिक एक हजार ४१३ मतांच्‍या फरकाने विजय.

* ॲड. नितीन ठाकरे यांनी एक हजार २६१ मतांच्‍या फरकाने केला नीलिमाताई पवार यांचा पराभव.

* डॉ. सुनील ढिकलेंकडून ३०९ मतांच्‍या फरकाने आमदार माणिकराव कोकाटेंचा पराभव.

* नियमावलीचा संदर्भ देत, कोकाटे समर्थकांचा फेरमोजणीचा अर्ज निवडणूक मंडळाकडून अमान्‍य.

* प्रगती पॅनलच्‍या एकाही उमेदवाराला ओलांडता आला नाही पाच हजार मतांचा टप्पा.

* परिवर्तनच्‍या पंधरा उमेदवारांना पाच हजारांहून अधिक मते

* प्रथमच निर्मिती उपाध्यक्ष होण्याचा विश्‍वास मोरे यांना बहुमान.

* शोभा बोरस्‍ते, शालन सोनवणे यांना महिला सदस्‍य होण्याचा बहुमान.

* नांदगावचे अमित बोरसे-पाटील ठरले सर्वांत कमी वयाचे तालुका संचालक.

पावसामुळे विजयी मिरवणूक रद्द

गेल्‍या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिलेली असताना मंगळवारी दुपारी मात्र जोरदार पाऊस झाला. परिस्‍थितीचा अंदाज घेत नियोजित विजयी मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आपल्‍या वाहनाने संस्‍थेच्‍या कार्यालयात पोचले.

ठाकरे बंगल्‍यावर हितचिंतकांची गर्दी

निवडीबद्दल ॲड. ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी मंगळवारी दिवसभर गंगापूर रोडवरील ठाकरे बंगल्‍यावर हितचिंतकांनी गर्दी केली होती. पुष्पगुच्‍छ, शाल देताना ॲड. ठाकरे यांचा सत्‍कार करण्यात आला. या वेळी संस्‍थेचे सभासद, सेवकांसह वकील, व्‍यावसायिक संघटना आणि वैक्‍तिगत स्वरूपात सत्‍कार करण्यात आला. फोनद्वारे दिवसभर शुभेच्‍छा देणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे, व्‍हॉट्‌सॲप व फेसबुकवर स्‍टेटस ठेवताना अभिनंदन केले.

टॅग्स :NashikElection Results