
नाशिक : बाथरुममधील गिझरच्या गॅस गळतीने एका आठवड्यात तरुणीसह ज्येष्ठ वैमानिकाच्या गुदमरुन झालेल्या मृत्यूने नाशिक हादरले आहे. गॅस गिझरमधील तांत्रिक दोष ऐरणीवर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी बाथरुममध्ये गिझर अन सिलेंडर एकत्र ठेऊ नका इथंपासून ते रिकाम्या जागेत गिझरसह सिलेंडर ठेऊन गरम पाणी बाथरुममध्ये आणले जावे इथंपर्यंतचा सल्ला दिला आहे.
संकुलनगरमधील साक्षी जाधव (वय २१) ही तरुणी सायंकाळी आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली होती. अर्धा तास झाला तरी साक्षी बाहेर कशी येत नाही म्हटल्यावर घरच्यांनी बाथरुमचा दरवाजा तोडला, तर साक्षी बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. तिला उपचारासाठी नेले पण तिचा मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी ही दुर्घटना घडलेली असताना एअर इंडियाच्या ज्येष्ठ वैमानिक रश्मी पराग गायधनी (वय ४९) (Air India pilot Rashmi Gaidhani) यांचा बाथरुममधील गिझरच्या गॅस गळतीमुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची आणखी एक दुर्घटना घडली.
या दोन्ही घटनांच्या अनुषंगाने शास्त्रज्ञ ओमप्रकाश कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. ते ‘सकाळ'शी बोलताना म्हणाले, की सिलेंडर आणि गिझर बाथरुममध्ये एकत्र ठेवले जाते. त्यातच पुन्हा गिझरचे फिटींग योग्य पद्धतीने केले आहे काय? याची पडताळणी केली जात नाही. शिवाय स्वस्त आणि हालक्या वस्तू खरेदी करुन जीव धोक्यात घातला जातो. गॅस सिलेंडर कंपन्यांच्या दोष यानिमित्ताने दिसून येतो. रेग्युलेटर लावल्यानंतर रबरी वॉशर ठीक नसल्यास गॅस गळती होते. बाथरुममध्ये गॅस बाहेर येतो हे लक्षात येईल असे नाही. त्यामुळे स्नान होईपर्यंत गॅस साठून राहतो आणि त्यात गुदरमल्यासारखे होते. म्हणजेच काय, तर गॅसच्या येणाऱ्या वासाकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. बाथरुममध्ये नैसर्गिक हवा खेळती राहत नसल्यास पंखा बसवायला हवा. एवढेच नव्हे, तर घरी सिलेंडर आल्यावर आणि गिझरसाठी सिलेंडर जोडत असताना साबणाचे पाणी टाकून बुडबुडे येतात का? हे पाह्यला हवे.
वास्तुविशारद संजय पाटील म्हणाले, की गॅस गिझरसाठी सुरक्षेचे विविध ‘फिचर' उपलब्ध झाले आहेत. पण तरीही गॅस गिझरच्या यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीकडे वेळोवेळी लक्ष देणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये घडलेल्या दुर्घटनांमध्ये गॅस गिझर प्रणालीच्या वापराचा प्रश्न तयार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गॅस गळती होताच गुदमरते
गॅस जड असतो. त्याची गळती सुरु झाल्यावर जमिनीच्या बाजूने तो पसरतो. खिडकीतून बाहेर जात नाही. त्यामुळे बाथरुमचा दरवाजा बंद केल्यावर गॅस गळती होताच, गुदमरते. हे टाळण्यासाठी काही घरांमधून बाल्कनीत सिलेंडर ठेवला गेला आहे. जाळीने तो बंदिस्त करण्यात आला आहे. शिवाय काही घरांमधून गिझरसह सिलेंडर उघड्या ठिकाणी ठेऊन गरम पाणी सुरक्षित नळीतून बाथरुममध्ये नेण्यात आले आहे, असे सांगून वैशंपायन गॅस एजन्सीचे संचालक रोहित वैशंपायन यांनी आम्ही गिझरसाठी सिलेंडर अथवा कनेक्शन देणे बंद केले असल्याची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.