इगतपुरीची शैलपुत्री घाटनदेवी

इगतपुरीची शैलपुत्री घाटनदेवी
Published on: 
फोटो -NSK26H33068 नवसपूर्तीचे श्रद्धास्थान ------------------ इगतपुरीची शैलपुत्री घाटनदेवी इगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घाटनदेवी मंदिरात विजयादशमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवीच्या चरणी पितळी घंटा अर्पण करण्याची परंपरा असून, नवरात्रोत्सवात राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. - विजय पगारे इगतपुरी तालुक्यातील नागरिकांचे आराध्य दैवत, ग्रामदैवत तसेच विविध पंथीय साधू संतांच्या पदस्पर्शाने तालुका पावन झाला आहे. त्याचबरोबर प्रातःस्मरणीय घाटनदेवीच्या सानिध्यामुळे तर त्या पावित्र्यात अधिक भर पडली आहे.मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकमार्गे मुंबईकडे जाताना अत्यंत नागमोडी वळणाचा कसारा घाट आहे. इगतपुरीच्या परिसरात प्रवेश करतानाच थळ घाटाच्या पायथ्याशी शिवकालीन काळापासून प्राचीन असे देवीचे मंदिर आहे. घाटात देवीचे स्थान असल्यामुळे घाटनदेवी म्हणून ते प्रसिद्ध झाले आहे. विजयादशमीच्या पार्श्‍वभूमीवर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून देवी ट्रस्टच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजयादशमीनिमित्त येथे पितळी घंटा देवीचरणी वाहणे, जाऊळ, सत्यनारायण पूजन, दुर्गा सप्तशती पठण व पारायणे करून नवसपूर्तीसाठी सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. अशी आहे आख्यायिका घाटनदेवीचे रूप अत्यंत विराट आहे. संकटसमयी भक्तांच्या मदतीला धावणारी व नवसाला पावणारी म्हणून घाटनदेवीचा महिमा आहे. घाटनदेवी मातेचा श्री दुर्गा सप्तशतीमध्ये शैलपुत्री, ब्रम्हाचारिणी, चंद्रघाटा, कृष्णाडा, स्कंदमाता, कात्यायानी, कालरात्री, महागिरी, महासिध्दी, महागौरी व रिद्धी - सिद्धी अशी विविध रुपे आहेत. यातील पहिले रुप म्हणजे शैलपुत्री म्हणजेच घाटनदेवी माता. प्राचीन माहितीनुसार देवी वज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे येण्यास निघाली. त्यावेळेस रस्त्यात देवीने या ठिकाणी विश्रांती घेतली व ती येथेच स्थिरावली. शैलाधिराज तनया म्हणून या देवीची ओळख आहे. नैसर्गिक वातावरण आणि सुंदर परिसराने मोहीत होऊन देवीने येथे मुक्काम ठोकला अशी पुरातन कथा आहे. मंदिराचा जिर्णोद्धार व शाश्वत स्थापना वैदीक काळापासून देवीची येथे स्थापना झाल्याचे नमुद आहे. घाटनदेवीचा पूर्वी जुन्या ठिकाणी तांदळा होता. तो होता तसाच आजही कायम आहे. पूर्वापार असलेले जीर्ण मंदिर पडल्याने गावातील ज्येष्ठ भाविकांनी विचार करून लगेच नव्या मंदिराच्या कामास सुरुवात केली. दोन ते तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मंदिराची उभारणी करण्यात आली. २१ एप्रिल १९८० रोजी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजलाल रावत यांच्या हस्ते करण्यात आली. हे देवस्थान १९९६ मध्ये धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवात या ठिकाणी नऊ दिवस यात्रा भरते, म्हणूनच राज्याच्या विविध भागातून भाविक दाखल होतात. नवसाला पावणारी घाटनदेवी म्हणून देवीची ख्याती आहे. मनोकामना पूर्ण झाल्यावर येथे प्रत्येक भाविक पितळी घंटा देवीचरणी वाहतो तर बरेच भाविक येथे जाऊळ, सत्यनारायण पूजन, दुर्गा सप्तशती पठण, पारायणे करून नवसाची पूर्ती करीत असतात. नवरात्रीच्या काळात येथे नगर, जव्हार, मोखाडा, मुंबई, ठाणे, कल्याण, जळगाव, भुसावळ, औरंगाबाद, मालेगाव, अमळनेर, चोपडा, राजूर, अकोले, जालना, बीड, परांडा आदी भागातील भाविकांची उपस्थिती लक्षणीय असते .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com