
नाशिक : तरुणींच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १८) दुपारी घडली. गंगापूर रोडवर असलेल्या महाविद्यालयातील कॅन्टीन परिसरात घडलेल्या विद्यार्थिनींच्या फ्रीस्टाईल हाणामारी पाहाण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, प्रियकराशी (बॉयफ्रेंड) निगडित वादातून भांडण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तरुणींच्या पालकांना पाचारण करताना समज देऊन त्यांना सोडण्यात आले आहे. (girl Students freestyle fight over boyfriend controversy in college Premises Nashik Latest Marathi News)
नेहमीप्रमाणे शुक्रवारी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रांगण गजबजलेले असताना, अचानक तरुणींच्या दोन गटांमध्ये वाद झाल्याचे निदर्शनात आले. अवघ्या काही मिनिटात या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. गंगापूर रोडवरील एका महाविद्यालय प्रांगणात झालेल्या विद्यार्थिनीमधील ही हाणामारी पाहाण्यासाठी प्रांगणातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विद्यार्थिनींच्या गटाकडून एका विद्यार्थिनीला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
दरम्यान, महाविद्यालयात तैनात सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत भांडण मिटविले. हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात या तरुणींना नेताना त्यांच्या पालकांनाही पाचारण करण्यात आले. घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती पालकांना देण्यात आली व समज देऊन विद्यार्थिनींना सोडून देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगितले आहे.