धुळे : मुख्य अंकातील पानासाठी....
--
जागतिक हात धुवा दिनी होणार जनजागृती
--
प्रात्यक्षिकांमधून पटवून देणार स्वच्छतेचे आरोग्यदायी महत्त्व
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ : हात धुण्याचे आरोग्यदायी फायदे आणि महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी गुरुवारी (ता. १५) जिल्ह्यात जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ठीक-ठिकाणी साबणाने हात धुण्याचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार आहे.
-
२००८ पासून दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना विविध उपक्रम राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गावपातळीवर सर्वसामान्य ग्रामस्थांना हात धुण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी ठीक-ठिकाणी प्रत्यक्ष साबणाने हात धुण्याचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. यासोबतच नियमित हात धुण्यामुळे होणाऱ्या फायद्यांबाबत लोकांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शाळांमध्ये साबणाची उपलब्धता व्हावी म्हणून गावात साबण गोळा करण्यासाठी विशेष रॅली काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निशा जाधव यांनी केले आहे.