Nashik | रामकुंड नव्हे...रामतीर्थ! : ‘सुरस सर्वतीर्थे आदि पुरातन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sant Shrestha Nivrittinath Maharaj samadhi at Trimbakeshwar.

Nashik | रामकुंड नव्हे...रामतीर्थ! : ‘सुरस सर्वतीर्थे आदि पुरातन’

नाशिक :

पंचमीचे दिवशीं गेले पंचवटीं। उतरले तटीं गौतमीचे।
नामा म्हणे शेवट केला वनमाळी। रहाती ये स्थळीं निवृत्तिराज।
सुंदरनारायण गौरविले फार। केला नमस्कार वैष्णवांनीं।
सुरस सर्वतीर्थें आदि पुरातन। केली नारायणें तीर्थयात्रा।
विसोबा खेचर परिसा भागवत। अनेक ते संत बैसविले।
मध्यें निवृत्तिराज पांडुरंग पुंडलिक। पाहती कौतुक गौतमीचे।
दशमीचे दिवशीं केलें ते प्रस्थान। विधि नारायण सांगतसे।
नामा म्हणे श्रीरंगा गौरविले सकळ। झालासे विकळ निवृत्तिराज।

संत नामदेव गाथामधील हा अभंग आहे. स्मार्त चूडामणि शांतारामशास्त्री भानोसे यांनी संत नामदेव गाथातील या अभंगातील ‘सुरस सर्वतीर्थे आदि पुरातन’ असा ‘रामतीर्थ’च्या अनुषंगाने गौरव अधोरेखित केला आहे. ते म्हणाले, की सप्तशृंगगडावरील आदिमाया-आदिशक्ती भगवती देवीच्या दर्शनानंतर ज्येष्ठ पंचमीला संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज गोदावरीच्या तीरावर पोचले. त्यांचा गोदावरीच्या तीरावर पाच दिवस मुक्काम राहिला असून, ज्येष्ठ दशमीला त्यांनी त्र्यंबकेश्‍वरकडे प्रस्थान केले आणि संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांनी संजीवन समाधी घेतली. (Glory in Saint Namdev saga About Ramtirtha on godaghat nashik news)

सुंदरनारायण मंदिर ते मोदकेश्‍वर मंदिर हा दक्षिणवाहिनी गोदावरीचा भाग ‘रामतीर्थ’ म्हणून गौरवाने संबोधला जावा, असा नाशिककरांचा आग्रह आहे. ब्रह्मपुराण, आनंद रामायण, पद्मपुराण, स्कंदपुराण यामधील अधोरेखित करण्यात आलेल्या श्‍लोकांसह संत नामदेव गाथामधील अभंगाने नाशिककरांची आग्रही मागणी पक्की झाली आहे. तीर्थांमधील आणखी एक तीर्थ म्हणजे, रामगया तीर्थ. त्याबद्दल सांगताना श्री. भानोसे म्हणाले, की पिंडदानासाठी गया तीर्थावर जाणे शक्य नाही. अशांनी रामतीर्थावर श्राद्ध केल्याने गया श्राद्धाचे पुण्य मिळते. म्हणून ‘रामगया तीर्थ’ असे ओळखले जाते.

शके १८१८ चा गोदावरी यात्राक्रम निर्णय

मोहाडीमध्ये वास्तव्यास असलेले वेदशास्त्रसंपन्न श्रीधरशास्त्री पुराणिक यांनी गोदावरी यात्राक्रमाबद्दल पत्र लिहिले होते. त्यावर ग्वाल्हेरचे बहादर शिंदे सरकार निवासी असलेले महामहोपाध्याय गोपाळाचार्य कऱ्हाडकर यांनी शके १८१८ मध्ये निर्णय दिला होता. नाशिकमध्ये दक्षिणवाहिनी गोदावरी असून, अरुणा-वरुणा संगम, ब्रह्मतीर्थ, ‘रामतीर्थ', अस्थिविलय तीर्थ आदी पुण्यकारक तीर्थे आहेत, असे त्या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्‍वर यात्रा क्रमाविषयक स्पष्टीकरण स्कंद पुराणातील श्‍लोकाच्या आधारे निर्णयात देण्यात आले आहे.

स्कंद पुराणातील वचनानुसार पहिल्यांदा नाशिकला जाऊन विधिपूर्वक वपन, श्राद्ध, दानादि करावे. त्यानंतर पंचवटीत प्रभू श्रीरामचंद्र यांचे दर्शन घ्यावे. पुढे त्र्यंबकेश्‍वरला जावे. कुशावर्तात स्नान, श्राद्ध, दानादि करावे. लोककल्याणकर शंभू महादेवांचे दर्शन घ्यावे. नंतर पंचवटीत परत येऊन दयासागर प्रभू श्रीरामचंद्र यांचे पुन्हा दर्शन घ्यावे आणि नंतर घरी जावे. श्री. भानोसे यांनी अभ्यासातून पुढे आलेला हा मुद्दा सांगितला.

हेही वाचा: Triplets Born : केरसाणेतील महिलेने दिला तिळ्यांना जन्म; बाळ सुरक्षित

रामतीर्थातंर्गतचे अस्थिविलय तीर्थ

रामतीर्थातंर्गत अस्थिविलय तीर्थ आहे. त्यामध्ये अस्थी विसर्जन केल्यावर साडेतीन तासांत अस्थींचे पाणी होते. पौराणिक, ऐतिहासिक कालखंडापासून ते स्वातंत्र्यानंतर अस्थिविलय तीर्थामध्ये महात्मा गांधी, पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, कन्नमवार, यशवंतराव चव्हाण, सोनोपंत दांडेकर आदींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले आहे. अस्थिविलय तीर्थमध्ये महात्मा गांधी यांच्या अस्थिविसर्जन केल्याचे प्रतीक म्हणून ‘गांधी स्मृती’ ज्योत घाटावर उभारण्यात आली आहे.

नाशिकमधील कुंड

लक्ष्मण धनुष्य
श्रीराम सीता
अहिल्या शारंगपाणी
द्विमुखी हनुमान सूर्य
दशाश्‍वमेघ रामगया
पेशवा खंडोबा
माळी मुक्तेश्‍वर

"कुलदैवत सप्तशृंग देवीच्या दर्शनासाठी ज्ञानोबा माउली आले होते. त्या वेळी माउलींची नाशिकला तीर्थयात्रा झाल्याचा उल्लेख तीर्थावळींच्या अभंगामध्ये आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पंचमीला कुलदैवतेच्या दर्शनासाठी नाशिकला आले आणि त्यांनी पुरातन तीर्थांना धन्य करत दशमीला ते त्र्यंबकेश्वरला गेले. त्यामुळे रामतीर्थ हे पुरातन आहे. बांधकाम झाल्याने त्यानंतर ‘रामकुंड’ असे संबोधले गेले. मात्र कुंड हे मर्यादित स्वरूपाचे असल्याने ‘रामतीर्थ’ असे संबोधले जाणे आवश्यक आहे." - माधवदास महाराज राठी (नाशिक)

हेही वाचा: NMC Water Supply Scheme Plan : पाणीपुरवठा योजनेत 50 टक्के खर्चाचा भार