टुडे ४ : मेन फिचर
---
NSK26H34640
जळगाव : ‘जीएमसी’त अत्याधुनिक नेत्र विभाग व मॉड्युलर बाल अतिदक्षता विभागाच्या लोकार्पणप्रसगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे आदी.
-----
‘जीएमसी’त आता नेत्रसेवेची अत्याधुनिक सुविधा
पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; सुसज्ज मॉड्यूलर बाल अतिदक्षता विभाग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.६ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रसेवेच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून उत्कृष्ट, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवरच झाल्या पाहिजेत. हे रुग्णालय नेत्रोपचार व नवदृष्टीचे आदर्श केंद्र म्हणून नावारूपाला यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उभारण्यात आलेल्या नेत्र विभागातील अत्याधुनिक युनिट्ससह मॉड्युलर बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण पालकमंत्री पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की प्रत्येक गरजू रुग्णाला दर्जेदार उपचारांसोबत माणुसकीची वागणूक मिळाली पाहिजे. शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांच्या विश्वासाचे आणि आधाराचे केंद्र बनले पाहिजे.
आमदार नंदकिशोर महाजन, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, की आधुनिक नेत्रतपासणी व शस्त्रक्रियांच्या सुविधा जळगावातच उपलब्ध झाल्यास विशेषतः वृद्ध आणि गरजू रुग्णांना उपचारांसाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. नेत्र विभाग अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक नियोजन करून प्रस्ताव सादर करावेत. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
मंत्री सावकारे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जळगावचे नाव उंचावले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचा विकास व प्रस्तावित मेडिकल हबची सद्यस्थिती विशद केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांनी आभार मानले. उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. उमेश लाड, अधिसेविका अरुणा बोराडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. डॅनियल साजी, संजय चौधरी आदी उपस्थित होते.
चौकट
अत्याधुनिक सुविधा
मॉड्युलर बाल अतिदक्षता विभागात (पीआयसीयू) एक महिना ते १२ वर्षे वयोगटातील गंभीर आजारी बालकांसाठी श्वसनविकार, न्यूमोनिया, सेप्सिस, विषबाधा आदींवर अत्याधुनिक अतिदक्षता व आपत्कालीन उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे. अत्याधुनिक नेत्र विभागात नेत्रतपासणी, निदान व शस्त्रक्रिया एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यासाठी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ऑपरेटिंग मायक्रोस्कोप, अल्ट्रा-वाइड फिल्ड फंडस कॅमेरा, एनडी याग लेसर, व्हिज्युअल फील्ड ॲनालायझर आणि फेको इमल्सिफिकेशन प्रणालीसारखी आधुनिक उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच नेत्रदान, नेत्रपटल संकलन आणि जनजागृतीला गती देण्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध झाली आहे.
----