Nashik Crime News : बकरा व्यावसायिकाला 2 लाखाला लुटले; दसाणे-खडकी रस्त्यावर लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik crime news

Nashik Crime News : बकरा व्यावसायिकाला 2 लाखाला लुटले; दसाणे-खडकी रस्त्यावर लूट

मालेगाव (जि. नाशिक) : दसाणे-खडकी रस्त्यावरील पाट कालव्याला लागून जाणाऱ्या लेंडाणे शिवारात बोलेरो पिकअप रस्त्यात अडवून पिकअप चालक तथा बकरा खरेदी-विक्री व्यावसायिकाशी किरकोळ कारणावरुन वाद घालत त्याच्या चेहऱ्यावर स्प्रे मारुन पिकअपमधील दोन लाख १० हजार रुपये दुचाकीवरुन आलेल्या दोघा भामट्यांनी लुटण्याचा प्रकार घडला.

शनिवारी (ता.१८) रात्री सव्वादहाच्या सुमारास हा प्रकार घडला. लुटारु फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (Goat businessman robbed of 2 lakhs Loot on Dasane Khadki road Nashik Crime News)

करंजगव्हाण (ता. मालेगाव) येथील बकरा व्यावसायिक सिराज नवाब सैय्यद (वय ४०) हे आपल्या मालकीच्या बोलेरो पिकअपमधून (एमएच ४१ एजी ०२१२) करंजगव्हाणकडे जात असताना पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या डिसकव्हरवरील दुचाकीस्वाराने पिकअपला ओव्हरटेक करीत गाडी अडवली.

दुचाकीवरील दोघे संशयित २५ ते ३० वयोगटातील होते. त्यांनी आमच्यावर का थुंकला? अशी कुरापत काढून गाडी बाजुला घेण्यास सांगितले. पिकअप बाजूला लावत असताना संशयितांनी चेहऱ्यावर स्प्रे मारल्याने मला काही दिसेनासे झाले.

या दरम्यान मला गाडीतून खाली उतरवून हाताबुक्क्यांनी मारहाण करीत गाडीच्या शिटाखाली ठेवलेली दोन लाख १० हजार रुपये रोख असलेले पैशांची पिशवी घेऊन फरार झाले. सिराज सैय्यदने या प्रकरणी रविवारी (ता.१९) तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

उपअधिक्षक पुष्कराज सूर्यवंशी, सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक स्वप्नील कोळी यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांनी सिराजकडून संशयितांची चेहरेपट्टी व वर्णन बारकाईने नोंदवून घेतले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

सिराजच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरुध्द जबरी चोरी व लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

शहर व परिसरातील मोबाईल व सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्यानंतर रस्तालुटीच्या प्रकारांना काही प्रमाणात आळा बसला होता. त्यातच हा प्रकार घडल्याने तालुक्यात विविध कमकाज व व्यवसायानिमित्त फिरणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

या दरम्यान महामार्गावरील चिखलओहोळ शिवारातील साईकार ढाब्याजवळ प्रशांत सातपुते (३१, रा. धुळे) या तरुणाच्या खिशातील मोबाईल व सोन्याची अंगठी असा ३५ हजार रुपयांचा ऐवज दोघा संशयितांनी हाताचापटीने मारहाण करीत चोरुन नेला.

यात ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी व पाच हजार रुपयांचा रेडमीचा मोबाईल होता. सातपुते यांच्या तक्रारीवरुन दोघा अनोळखींविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.