धुळे : टुडे पान २ साठी....अँकर
--
धुळ्यात दोन दिवसीय शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण
--
शेतकरी, महिलांचा सहभाग ; तज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २९ : ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालकांसाठी शेळीपालन हा उत्पन्नाचा एक पूरक व्यवसाय ठरू शकतो. याच उद्देशाला डोळ्यांसमोर ठेवून राहुरी (जि. अहिल्यानगर) महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येथील कृषी विज्ञान केंद्र आणि लुपिन फाउंडेशनच्या सहकार्याने शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच दोन दिवसीय शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम झाला. या उपक्रमात शेतकरी व महिलांचा प्रतिसाद पाहायला मिळाला.
-
शासकीय कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता राहुल देसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. गिरीश पाटील, कृषी विज्ञान केंद्रचे कार्यक्रम समन्वयक दिनेश नांद्रे, शास्त्रज्ञ रोहित कडू, प्रियांका तेलंगे, धनराज चौधरी, विनोद मासुळे, तुषार सैंदाणे आदी उपस्थित होते. प्रारंभी, कृषी विज्ञान केंद्रचे कार्यक्रम समन्वयक दिनेश नांद्रे यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला. शेतकऱ्यांनी शेळीपालनाकडे पारंपरिक दृष्टिकोन सोडून शास्त्रीय व व्यावसायिक पद्धतीने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आणि तांत्रिक ज्ञानाचा प्रत्यक्ष शेळीपालनात उपयोग करण्याचे आवाहन केले.
अधिष्ठाता देसले यांनी योग्य पोषण, आरोग्य काळजी, शास्त्रीय व्यवस्थापन आणि बाजारपेठेचे नियोजन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात विविध सत्रांमध्ये तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या दिवशी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ धनराज चौधरी यांनी शास्त्रीय पद्धतीने शेळीपालन, संतुलित आहार व पोषण, गोठा स्वच्छता व व्यवस्थापन, तसेच रोग प्रतिबंध व आरोग्य व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात श्री. चौधरी यांच्यासह पशु विकास अधिकारी विशाल पाटील यांनी करडांचे संगोपन व आरोग्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात शेळी- बोकड विक्री, विपणन व्यवस्थापन आणि बाजारपेठेच्या नियोजनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय प्रशिक्षणार्थींना कृषी विज्ञान केंद्रातील शेळीपालन प्रात्यक्षिक प्रकल्पास भेट देऊन रचना व व्यवस्थापन पद्धतीची प्रत्यक्षात माहिती घेण्याची संधी मिळाली.
बाजरा संशोधन केंद्रचे प्रमुख खुशाल बराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षणाचा समारोप झाला. वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख दिनेश नांद्रे, जगदीश काथेपुरी आणि धनराज चौधरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिनिधी स्वरूपात प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्णत्वाची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. पंकज पाटील यांनी आभार मानले. हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र आणि लुपिन फाउंडेशनच्या सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी संयोजन केले.