
Onion Crisis : धामणगावला उभ्या कांदा पिकात सोडल्या शेळ्या; कवडीमोल भाव मिळत असल्याने उचलले पाऊल
येवला (जि. नाशिक) : जिवापाड जपलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने गुंतवलेले भांडवल तर दूरच पण कांदा विकायला न्यायला महाग झाला आहे.
यामुळे धामणगाव येथील शेतकऱ्याने कांद्याचा काढणीचा खर्च मिळणाऱ्या भावात परवडणारा नसल्याने एक एकराच्या कांदा पिकात चरण्यासाठी मेंढ्या सोडून देत आपला संताप व्यक्त केला आहे. (Goats left in standing onion crop in Dhamangaon by farmer step taken onion price getting low nashik news)
कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे संपूर्ण जिल्ह्यातच कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदे फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सातत्याने भाव कोसळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हताश होत चालला आहे.
जिल्ह्यात कांदा हे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांची भिस्त त्याच्यावरच असते. कांदा पिकावर रोटर फिरविण्याचा प्रकार निफाड तालुकयातील नैताळे येथे काल घडलेला असतांना नगरसूल येथेही कांद्याला अग्निडाग देण्याचा समारंभ सहा मार्चला कृष्णा डोंगरे यांनी ठेवला आहे.
कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे शेतकऱ्यांत नैराश्याची भावना निर्माण होत चालली आहे. रास्ता रोको, लिलाव बंद पाडललेजात आहेत. कांदा काढणीला साडे सात हजार रूपये खर्च लागणार असल्याने धामणगाव येथील दादा गुळवे यांनी आपल्या उभ्या कांदा पिकात मेंढ्या चरण्यास सोडून दिल्या.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
कांद्याला २०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने काढणीचा खर्च जास्त व उत्पन्न कमी असे विचित्र गणित झाले आहे. मेंढ्यांचे तरी पोट भरून लक्ष्मीचा आशीर्वाद सरकारला मिळेल अशा अनोख्या पद्धतीने या शेतकऱ्यांने राज्य शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.
"सरकारने केवळ युक्तिवाद करून कांदा प्रश्नी शेतकऱ्यांची चेष्टा करू नये. शेतात दहा रुपये गुंतवले तर प्रत्यक्षात पाच रुपये मिळणे ही मुश्किल झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन कांद्याला एकरी दोन हजार रुपयापर्यंत अनुदान जाहीर करण्याची नितांत गरज आहे अन्यथा शेतकरी कर्जबाजारी होतील."
- डॉ. मोहन शेलार, माजी गटनेते, पंचायत समिती, येवला.