फोटो : H35194
गोदाघाटावरील विद्रूपीकरण अखेर हटवले
मनपाची दंडात्मक कारवाई, स्वच्छता मोहीम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : छटपूजेसाठी गोदाघाटावर जागा आरक्षित करण्याच्या नादात काही भाविकांनी घाटाच्या दगडी पायऱ्यांवर ऑईल पेंटने स्वतःची नावे लिहून विद्रूपीकरण केले होते. रविवारी (ता. १५) उत्तर भारतीयांचा महत्त्वाचा सण असलेल्या छटपूजेदरम्यान हा प्रकार घडला. या घटनेमुळे गोदाप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती.
छटपूजा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेकडून घाटावरील कचरा आणि निर्माल्य उचलण्यात आले. मात्र, पायऱ्यांवर रंगवलेली नावे तशीच असल्याने पर्यावरणप्रेमींनी ती त्वरित हटवण्याची मागणी लावून धरली. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास महापालिकेच्या कार्यालयासमोर ऑईल पेंट ओतून आंदोलन करण्याचा इशारा काही कार्यकर्त्यांनी दिला होता तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) याप्रकरणी निषेध नोंदविला होता. या इशाऱ्यानंतर आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापालिका प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलली. छटपूजेच्या दिवशी घाटाचे विद्रूपीकरण करणाऱ्या काही विघातक प्रवृत्तींचा शोध घेऊन महापालिकेने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच, मंगळवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवून गोदाघाटावर रंगवलेली सर्व नावे काढून टाकण्यात आली असून घाट पुन्हा स्वच्छ करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गोदाप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.