पूर्वतयारीवेळी गोदावरी महाआरतीवरून वाद
मंत्री महाजनांचा मध्यस्थीचा प्रयत्न; बैठकीत यंत्रणांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१६ : पंचवटीतील रामतीर्थ येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ ऑक्टोबर रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा होत आहे. या सोहळ्यानिमित्ताने सायंकाळी गोदावरी नदीच्या महाआरती होणार असून राष्ट्रपती त्यात सहभागी होतील. त्यामुळे यादिवशी स्वतंत्र दोन आरतीऐवजी एकच आरती करावी, असा प्रस्ताव कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. पण, पुरोहित संघाने आरतीची परंपरा खंडित होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे वादावर तोडगा काढण्यासाठी रामतीर्थ सेवा समिती व पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. पण, चर्चेत एकमत होऊ न शकल्याने आरतीचा गुंता कायम आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता.१६) कुंभमेळा मंत्री महाजन यांनी सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. मंत्री महाजन यांनी बैठकीत राष्ट्रपती मुर्मू या ध्वजारोहणासह सायंकाळी होणाऱ्या गोदावरीच्या महाआरतीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या दिवशी गोदाकिनारी एकच आरती करावी, अशी सूचना त्यांनी केली. यानिमित्ताने नाशिकची प्रतिमा देशभरात योग्य पद्धतीने पोहोचण्यास मदत होईल, असा उद्देश महाजन यांनी बैठकीत व्यक्त केला. परंतु, पुरोहित संघाने या प्रस्तावाला विरोध दर्शविला. त्यामुळे वादंग उभे ठाकले आहे. दरम्यान, बैठकीत राष्ट्रपतींसह व्हीव्हीआयपींच्या आगमन-निर्मगन, बैठक व्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या अनुषंगाने सखोल चर्चा करण्यात आली.
तोडग्याविना चर्चा आटोपती
ध्वजारोहण बैठकीतील वादानंतर मंत्री महाजन यांनी पुरोहित संघ व रामतीर्थ सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या ॲन्टी चेंबरमध्ये चर्चा केली. बंद दाराआड झालेल्या चर्चेत मंत्री महाजन यांनी दोन्ही संघटनांमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पुरोहित संघाने आरतीची परंपरा आपलीच असल्याचे सांगत या प्रथेत खंड पडू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे दालनात जोरदार खडाजंगी झाली. सरतेशेवटी एकत्रित आरतीवर कोणताही ठोस निर्णय न होता चर्चा आटोपती घेण्यात आली. त्यामुळे या प्रश्नी पुन्हा एकत्र बसून तोडगा काढण्यावर दोन्ही बाजूंनी एकमत झाले.
कायमस्वरूपी एकच आरती : महाजन
सिंहस्थ ध्वजारोहणानिमित्ताने गोदावरीच्या आरतीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढताना एकच आरती व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. येत्या ३१ तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत एकच आरती होईल. तसेच हाच अजेंडा पुढेही कायम ठेवला जाईल, असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला. मात्र, पुराेहित संघाचे सतीश शुक्ल यांनी पारंपारिक आरतीत कोणतीही खंड पडू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रश्नावर अंतिम काय तोडगा निघणार याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.